समुद्र किनाऱ्यांवरील गैरप्रकार; तीन वर्षांत १,३७१ जणांवर कारवाई

४१.८६ लाखांचा दंड : सर्वाधिक प्रकरणे उघड्यावरील मद्यपानाची

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
15th September, 08:56 pm

गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यांवर गेल्या तीन वर्षांत घडलेल्या पाच वेगवेगळ्या गैरप्रकारांविरोधात पोलिसांनी कडक कारवाई केली आहे. याअंतर्गत १,३७१ जणांवर गुन्हे दाखल करून त्यांच्याकडून ४१.८६ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. यात सर्वाधिक म्हणजे ९३ टक्के दंड हा उघड्यावर मद्यपान केल्याप्रकरणी ठोठावण्यात आला असून, त्यानंतर किनाऱ्यावर वाहन चालवणाऱ्यांचा क्रमांक लागतो, असे पर्यटन खात्याने सांगितले.

तीन वर्षांत १,३७१ जणांवर कारवाईसमुद्रकिनाऱ्यांवरील विविध गैरप्रकारांप्रकरणी ४१.८६ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असून, त्यातील सुमारे ९३ टक्के दंड उघड्यावर मद्यपान करणाऱ्यांकडून वसूल झाला आहे.

उघड्यावर मद्यपानाची सर्वाधिक प्रकरणे

पर्यटन खात्याने दिलेल्या आकडेवारीनुसार, २०२४ ते २०२६ या कालावधीत समुद्रकिनाऱ्यावर उघड्यावर मद्यपान केल्याप्रकरणी १,२८८ प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत. यातून ४०.५३ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

यामध्ये २०२४ मधील ३७ उल्लंघनांवर १.१३ लाख रुपये दंड, २०२५ मधील १,१८५ उल्लंघनांवर ३५.४५ लाख रुपये दंड आणि २०२६ मधील आतापर्यंतच्या ६६ उल्लंघनांवर ३.९५ लाख रुपये दंड करून कारवाई करण्यात आली आहे.

किनाऱ्यावर वाहन चालवणाऱ्यांवरही कारवाई

समुद्रकिनाऱ्यावर बेकायदा वाहन चालवल्याप्रकरणी ६५ प्रकरणे नोंदवून ५५ हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला. २०२४ मध्ये अशा प्रकारची एकही कारवाई झाली नाही. मात्र, २०२५ मध्ये ६० उल्लंघनांवर कारवाई करून ३ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला, तर २०२६ मध्ये आतापर्यंत ५ प्रकरणांवर कारवाई करण्यात आली आहे.

कचरा फेकणाऱ्यांवर कारवाई

किनाऱ्यावर कचरा फेकल्याप्रकरणी गेल्या तीन वर्षांत १४ उल्लंघने नोंदवून ६४ हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला. २०२४ मध्ये या प्रकारचे एकही उल्लंघन नोंदवले गेले नाही. मात्र, २०२५ मध्ये १० जणांवर कारवाई करून ४४ हजार रुपये, तर २०२६ मध्ये आतापर्यंत ४ प्रकरणांमध्ये २० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

उघड्यावर स्वयंपाक अन् वस्तू विक्रीवरही कारवाई

समुद्रकिनाऱ्यावर उघड्यावर स्वयंपाक केल्याच्या तीन घटना नोंदवण्यात आल्या असून, त्यांच्याकडून ९ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. यामध्ये २०२५ मधील दोन प्रकरणांत ४ हजार रुपये आणि २०२६ मधील एका प्रकरणात ५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

तसेच, किनाऱ्यावर वस्तू विक्री केल्याचे केवळ एकच प्रकरण २०२५ मध्ये नोंदवले गेले असून, त्यात ५ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. २०२४ मध्ये या दोन्ही प्रकारांत एकही घटना नोंदवण्यात आली नव्हती.

हेही वाचा
सर्व पहा