पेडणे : गोवा-कर्नाटक-महाराष्ट्र सीमेवरील जंगल परिसरात फिरणाऱ्या ‘ओंकार’ या हत्तीचे आज सकाळी १७ सप्टेंबर रोजी पुन्हा गोव्यात आगमन झाले. तांबोसे, पेडणे येथे पोहोचला असून, त्याच्या आगमनामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आणि तो शेती, बागायतीची हानी करीत असल्याने; त्यांची चिंताही वाढली आहे.

सध्या या परिसरातील लोक श्री गणेश चतुर्थी उत्सव साजरा करण्यात मग्न आहेत. त्यातच ‘ओंकार’ हत्ती पुन्हा या परिसरात येऊन धडकला. ही माहिती मिळताच लोकांची चिंता वाढली. गेल्या काही महिन्यांत हत्तीने या परिसरात घातलेला धुमाकूळ आणि केलेली शेती, बागायती यांची हानी, याच्या आठवणी पुन्हा जागृत झाल्या.
गेल्या काही महिन्यांपासून गोवा, कर्नाटक, महाराष्ट्र या राज्यांच्या सीमा भागातील जंगलात हत्ती फिरत असतो. आणि नागरी वस्तीत घुसून वाहने, शेती, बागायती यांची हानी करतो. माड, केळी, पोफळीसहीत इतर झाडे मुळासकट उन्मळून काढतो. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्याप्रमाणात नुकसान होते. त्याचबरोबर स्थानिकांच्या सुरक्षेचा प्रश्नही उद्भवतो.
‘ओंकार’ला रोखा, स्थानिकांची मागणी
या ‘ओंकार’ हत्तीला बागायती, शेती आणि नागरी वस्तीत घुसण्यापासून रोखण्यासाठी स्थानिकांना बरीच शक्ती खर्ची घालावी लागते. एकूण परिस्थिती लक्षात घेऊन वन विभागाने ‘ओंकार’ हत्तीच्या हालचालींवर लक्ष ठेवून त्याला मानवी वस्तीकडे येण्यापासून रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिक आणि शेतकऱ्यांकडून होत आहे. त्याचबरोबर या समस्येवर कायमस्वरुपी तोडगा काढावा, अशी स्थानिकांची मागणी आहे.


