पणजी :भाजपला पराभूत करण्यासाठी राज्यातील सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येण्याची गरज असून, समविचारी पक्षांसाठी काँग्रेसने चर्चेची दारे बंद केलेली नाहीत. गोवा फॉरवर्ड आणि ‘आप’ने युती केली असली, तरी त्यांच्यासोबत चर्चा करण्यास हरकत नाही आणि अजूनही वेळ गेलेली नाही, असे काँग्रेसचे गोवा प्रभारी माणिकराव ठाकरे यांनी स्पष्ट केले.
गोवा फॉरवर्ड आणि आपने स्थापन केलेल्या ‘गोवा फर्स्ट’ या आघाडीसोबतही चर्चा करण्याची काँग्रेसची तयारी आहे. नेत्यांमध्ये सध्या जे काही आरोप-प्रत्यारोप होत आहेत, ते वैयक्तिक पातळीवर सुरू आहेत. मात्र, भाजपविरोधात इतर सर्व पक्षांची युती व्हावी, असा निर्णय पक्षाने घेतला असल्याने त्यासाठी काँग्रेसचे प्रयत्न सुरूच राहतील, असे माणिकराव ठाकरे यांनी सांगितले.
ठाकरे घेणार संघटनेचा आढावा
काँग्रेसच्या संकल्प यात्रेसह पक्षाच्या विविध कार्यक्रमांसाठी माणिकराव ठाकरे १८ सप्टेंबरला गोव्यात येणार आहेत. पक्षाची संकल्प यात्रा २२ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. या दौऱ्यात यात्रेच्या तयारीबरोबरच आपण संघटनेच्या कामाचा आढावा घेणार असल्याची माहिती ठाकरे यांनी दिली.
विधानसभा निवडणूक जवळ आल्याने राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला असून, युतीबाबत चर्चा करण्यासाठी काँग्रेसने विशेष समिती स्थापन केली आहे. या समितीच्या बैठका पार पडल्या असून, ‘आरजी’सोबतची युती जवळपास निश्चित झाली आहे.
मात्र, काँग्रेस आणि आरजी यांच्यात चर्चा सुरू असतानाच चतुर्थीच्या आदल्या दिवशी आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल आणि गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन ‘गोवा फर्स्ट’ आघाडीची घोषणा केली.
आप आणि गोवा फॉरवर्ड एकत्र येणे हा काँग्रेससह सामान्य जनतेसाठीही धक्का मानला जात आहे. या घोषणेनंतर प्रदेश काँग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर आणि गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू झाल्यामुळे आप, गोवा फॉरवर्ड आणि काँग्रेस यांच्यातील दरी वाढत आहे.
या नव्या आघाडीमुळे भाजपविरोधात सर्व विरोधी पक्ष एकत्र येण्याची शक्यता जवळपास संपुष्टात आली असली, तरी चर्चेची दारे खुली असल्याचे प्रभारी माणिकराव ठाकरे यांनी म्हटले आहे.
१) गोव्याची जनता भाजपच्या राजवटीला कंटाळली असून, सत्ताधाऱ्यांना पराभूत करण्यासाठी राज्यातील समविचारी पक्षांनी एकत्र यावे, अशी लोकांची इच्छा आहे.
२) भेटीदरम्यान प्रत्येक भागातील लोकांचे हेच मत दिसून येत असल्याने गोव्याच्या हिताचा विचार करून काँग्रेस पक्ष निर्णय घेईल.
३) गोवा फॉरवर्डसोबत चर्चेसाठी काँग्रेसचे नेते गेले होते, पण कोणताही ठोस निर्णय झालेला नाही. तरीही सर्व पक्षांशी युतीबाबत चर्चा होऊ शकते.
येत्या २२ सप्टेंबरपासून काँग्रेसची गोवा परिवर्तन यात्रा सुरू होणार असून, यात पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी तसेच अन्य नेते सहभागी होणार आहेत. या यात्रेनंतर गोमंतकीयांच्या भावना जवळून ऐकून घेण्याची संधी मिळेल, असे ठाकरे यांनी सांगितले.


