पुरी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७६व्या वाढदिवसानिमित्त देशभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत असताना ओडिशातील पुरी समुद्रकिनारी प्रसिद्ध वाळू शिल्पकार सुदर्शन पटनायक यांनी अनोख्या वाळूशिल्पातून त्यांना शुभेच्छा दिल्या. पटनायक यांनी तब्बल २५ फूट लांबीचे वाळूशिल्प साकारले आहे. त्यात २,५०० पणत्यांचा वापर करण्यात आला आहे.
‘आशिर्वाद - का दिया- २५ इयर्स ऑफ सेवा -हॅपी बर्थडे मोदी जी’ असे या कलाकृतीला नाव देण्यात आले आहे. पंतप्रधान मोदी यांच्या सार्वजनिक जीवनातील २५ वर्षांच्या सेवेला अधोरेखित करण्यासाठी २५ फुटांच्या वाळू शिल्पाची संकल्पना मांडण्यात आली आहे. त्याचबरोबर २,५०० पणत्या या प्रार्थना, आशीर्वाद आणि शुभेच्छांचे प्रतीक असल्याचे पटनायक यांनी सांगितले.

या वाळूशिल्पात पंतप्रधान मोदी यांचे चित्र भारतीय तिरंग्याच्या पार्श्वभूमीवर साकारण्यात आले आहे. हजारो पणत्यांच्या प्रकाशामुळे संपूर्ण कलाकृती अधिक आकर्षक दिसत होती. ही कलाकृती पाहण्यासाठी पुरी समुद्रकिनारी पर्यटकांची मोठी गर्दी झाली होती. सुदर्शन सँड आर्ट इन्स्टिट्यूटमधील विद्यार्थ्यांनीही हे भव्य वाळूशिल्प साकारण्यात सहभाग घेतला.
पटनायक यांनी पंतप्रधान मोदी यांच्या उत्तम आरोग्यासाठी, आनंदी आणि दीर्घायुष्यासाठी महाप्रभू जगन्नाथांकडे प्रार्थना केल्याचे सांगितले. तसेच मोदी यांचे देशसेवेचे कार्य पुढेही सुरू राहावे, अशी सदिच्छा व्यक्त केली.
मानस कुमार साहू यांनीही साकारले वाळूशिल्प
दरम्यान, वाळूशिल्पकार मानस कुमार साहू यांनीही पुरी समुद्रकिनारी पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त विशेष वाळूशिल्प साकारले. या कलाकृतीत ब्रिक्स परिषद, ‘ऑपरेशन सिंदूर’, राम मंदिर आणि ‘मेक इन इंडिया’ यांसारख्या विविध विषयांचा संदर्भ देण्यात आला आहे. पंतप्रधान मोदी यांचा वाढदिवस विश्वकर्मा पूजेशीही जुळतो, याचा उल्लेख या कलाकृतीत करण्यात आला.
पंतप्रधान मोदींचा ७६वा वाढदिवस
पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी १७ सप्टेंबर रोजी ७६ वर्षांचे झाले. २०१४ पासून त्यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात भाजपचे सरकार आहे. मोदी हे भारताचे सर्वाधिक काळ कार्यरत राहिलेले बिगर-काँग्रेस पंतप्रधान आहेत. त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून आपल्या राजकीय प्रवासाला सुरुवात केली. मागील तीन लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपच्या विजयात त्यांची प्रमुख भूमिका राहिली आहे.


