हुबळी गब्बूर येथे १९ सप्टेंबरला मेडिकल कॉलेजचे उद्घाटन

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची उपस्थिती : सुमारे ७०० कोटी रुपयांची गुंतवणूक

Story: गोवन वार्ता। प्रतिनिधी |
16th September, 11:26 pm
हुबळी गब्बूर येथे १९ सप्टेंबरला मेडिकल कॉलेजचे उद्घाटन

बेळगाव : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते १९ सप्टेंबर रोजी हुबळी येथील गब्बूर येथे केएलई जगद्गुरू गंगाधर महास्वामीजी मूरुसवीरमठ मेडिकल कॉलेज (जेजीएमएमएमसी)च्या नव्या शैक्षणिक इमारतीचे तसेच १,२०० खाटांच्या केएलई हॉस्पिटल अँड मेडिकल रिसर्च सेंटरचे लोकार्पण होणार आहे.

मूरुसवीरमठाचे जगद्गुरू गुरुसिद्ध राजयोगींद्र महास्वामी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी, कर्नाटकचे वैद्यकीय शिक्षण व कौशल्य विकास मंत्री डॉ. शरणप्रकाश आर. पाटील, कामगार व रोजगार मंत्री संतोष एस. लाड यांच्यासह लोकप्रतिनिधी, शिक्षणतज्ज्ञ, आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञ आणि केएलई परिवारातील सदस्य उपस्थित राहणार आहेत.

केएलई अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्चचे कुलगुरू पद्मश्री डॉ. प्रभाकर कोरे यांनी सांगितले की, कर्नाटक लिंगायत एज्युकेशन (केएलई) सोसायटीच्या मार्गदर्शनाखाली आणि केएएचईआरच्या घटक संस्था म्हणून कार्यरत असलेला गब्बूर येथील एकात्मिक कॅम्पस ५० एकर क्षेत्रावर विकसित करण्यात आला आहे. या प्रकल्पाचे बांधकाम क्षेत्र ३० लाख चौरस फुटांपेक्षा अधिक असून, सुमारे ७०० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे. मूरुसवीरमठाचे जगद्गुरू गंगाधर महास्वामीजी यांनी या प्रकल्पासाठी जमीन दान केली आहे.

डॉ. कोरे म्हणाले, जेजीएमएम मेडिकल कॉलेजला ऑक्टोबर २०२१ मध्ये राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मान्यता मिळाली. सुरुवातीला दरवर्षी १५० एमबीबीएस विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला आणि फेब्रुवारी २०२२ मध्ये पहिली तुकडी दाखल झाली. २०२५-२६ मध्ये प्रवेश क्षमता २०० जागांपर्यंत वाढविण्यात आली असून, २०२६-२७ पासून ती २५० जागांपर्यंत वाढविण्यात आली आहे. पुढील शैक्षणिक वर्षापासून २० विभागांमध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रमही सुरू करण्याचे नियोजन आहे.

महाविद्यालयात सध्या पाच तुकड्यांमध्ये सुमारे ८०० एमबीबीएस विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. आधुनिक व्याख्यानगृहे, सिम्युलेशन प्रयोगशाळा, संग्रहालये, संशोधन सुविधा, केंद्रीय ग्रंथालय आणि वसतिगृहे येथे उपलब्ध आहेत. संशोधन क्षेत्रातही महाविद्यालयाने प्रगती केली असून, प्राध्यापकांना विविध स्पर्धात्मक संशोधन अनुदाने मिळाली आहेत. यामध्ये आयसीएमआरच्या १.४ कोटी रुपयांच्या अनुदानाचाही समावेश आहे, असे डॉ. कोरे यांनी सांगितले.

१ जानेवारी २०२५ रोजी सेवा सुरू केलेले केएलई एचएमआरसी हे उत्तर कर्नाटक आणि शेजारील भागातील रुग्णांसाठी १,२०० खाटांचे बहुविशेषता व अतिविशेषता शिक्षण रुग्णालय आहे. येथे आपत्कालीन व ट्रॉमा केअर, अतिदक्षता विभाग, प्रगत निदान सुविधा तसेच विविध विशेष व अतिविशेष वैद्यकीय सेवा उपलब्ध आहेत. हृदयरोग, कर्करोग आणि अवयव प्रत्यारोपणाच्या सेवा लवकरच सुरू करण्यात येणार आहेत.

आरोग्यसेवेचे एकात्मिक केंद्र : कोरे

संस्था समुदाय आरोग्य उपक्रम, मोफत आरोग्य शिबिरे आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांसाठी सवलतीच्या दरात उपचार उपलब्ध करून देत आहे. तसेच सरकारी आरोग्य योजनांतर्गत उपचार मिळवून देण्याची सुविधाही उपलब्ध आहे. हुबळी येथील हा कॅम्पस वैद्यकीय शिक्षण, अत्याधुनिक आरोग्यसेवा, संशोधन आणि समाजसेवा यांचे एकात्मिक केंद्र म्हणून विकसित करण्यात आल्याचे डॉ. कोरे यांनी स्पष्ट केले. 


हेही वाचा
सर्व पहा