ज्येष्ठांना सायबर गुन्हेगारांकडून लक्ष्य; ३ वर्षांत ४९ कोटी रुपयांना लुबाडले

७१ तक्रारींची नोंद : खंडणी, डिजिटल अरेस्टच्या घटनांत वाढ

Story: गोवन वार्ता। प्रतिनिधी |
just now
ज्येष्ठांना सायबर गुन्हेगारांकडून लक्ष्य; ३ वर्षांत ४९ कोटी रुपयांना लुबाडले

पणजी : मागील काही वर्षांत सायबर गुन्ह्यांमध्ये मोठी वाढ झाली असून, विशेषतः ज्येष्ठ नागरिकांची सायबर फसवणूक वाढत आहे. मे २०२३ ते जुलै २०२६ या कालावधीत राज्यात सायबर गुन्ह्यांद्वारे ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक केल्याच्या ७१ तक्रारी नोंदवण्यात आल्या. या प्रकरणांमध्ये एकूण ४९.०७ कोटी रुपयांची फसवणूक झाली आहे. यामध्ये जून २०२६ मध्ये साळगाव पोलीस स्थानकात नोंद झालेल्या तब्बल १० कोटी रुपयांच्या फसवणुकीचा समावेश आहे. तर, सप्टेंबर २०२५ मध्ये पर्वरी येथे नोंद झालेली ९९ हजार रुपयांची फसवणूक या कालावधीतील सर्वात कमी रकमेची आहे.

ज्येष्ठ नागरिकांविरोधात सायबर गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे. २०२३ मध्ये अशा २ घटनांनी नोंद झाली होती. २०२४ मध्ये ही संख्या वाढून २४ झाली. २०२५ मध्ये अशा गुन्हांची संख्या कमी होऊन १४ झाली होती. तर, जानेवारी ते जुलै २०२६ मध्ये अशा ४२ गुन्ह्यांची नोंद झाली आहे. वर्षनिहाय पाहता २०२३ मध्ये ७२.५९ लाख रुपये लुबाडण्यात आले. २०२४ मध्ये ८.९४ कोटी रुपये, २०२५ मध्ये १३.२८ कोटी रुपये तर जानेवारी ते जुलै २०२६ दरम्यान २६.११ कोटी रुपये लुबाडण्यात आले. वरील काळात एकूण नोंद झालेल्या ७१ तक्रारींपैकी ५३ फसवणुकीच्या होत्या.

ऑनलाईन पद्धतीने खंडणी मागण्याच्या ५, डिजिटल अरेस्टची १, यूपीआय आणि अन्य स्वरूपाच्या फसवणुकीच्या १३ घटनांची नोंद झाली. ज्येष्ठ नागरिकांकडे आयुष्यभराची जमा केलेली बचत असते. परंतु, तुलनेने डिजिटल साक्षरता कमी असते. गुन्हेगार याचाच फायदा घेऊन वृद्ध व्यक्तींचे आर्थिक नुकसान करतात. तंत्रज्ञानाशी कमी परिचय, फसवणूक ओळखण्यात अडचण, सायबर सुरक्षेबद्दल मर्यादित माहिती, आर्थिक असुरक्षितता, खोटी माहिती ओळखण्यात अडचण आणि फसवणुकीची तक्रार करण्याची अनिच्छा, यांसारख्या काही कारणांमुळेही ज्येष्ठ नागरिक सायबर गुन्हेगारांचे सोपे लक्ष्य बनतात.

सायबर सुरक्षेसाठी कॉल सेंटरची स्थापना

सायबर गुन्हे रोखण्यासाठी पोलिसांकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. पोलिसांतर्फे ‘१९३०’ ही क्लाउड आधारित सायबर फसवणूक कॉल सेंटरची स्थापना करण्यात आली आहे. राज्यातील सायबर सुरक्षा अधिक प्रभावी करण्यासाठी सायबर योद्धा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. समाज माध्यमे तसेच अन्य माध्यमातून सायबर गुन्ह्यांविषयी वेळोवेळी जागृती करण्यात येते. पोलिसांतर्फे समाज माध्यमात सायबर सुरक्षित गोवा हा डिजिटल उपक्रम देखील राबवला जात आहे.