हरियाणाचे माजीमंत्री गोपाल कांडा यांच्याशी संबंधित ठिकाणांवर ईडीचे छापे

२४८ कोटींच्या रिअल इस्टेट गैरव्यवहाराची चौकशी; ६६१ गुंतवणूकदारांना फटका; वाटीका रिअल इस्टेट फसवणूकप्रकरणी हरियाणाचे माजीमंत्री, लोकहित पक्षाचे (एचएलपी) नेते तथा उद्योजक गोपाल कांडा यांच्याशी संबंधित गुरुग्राममधील तीन ठिकाणांवर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) गुरुवारी छापे टाकले. निवासस्थान, फार्महाऊस आणि कार्यालयावर हे छापे टाकण्यात आले. चार प्रकल्पांद्वारे ६६१ गुंतवणूकदारांकडून २४८ कोटी रुपयांहून अधिक रक्कम जमा करण्यात आल्याचा ईडीचा दावा आहे.

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
14 mins ago
हरियाणाचे माजीमंत्री गोपाल कांडा यांच्याशी संबंधित ठिकाणांवर ईडीचे छापे

गुरुग्राम : वाटीका रिअल इस्टेट फसवणूकप्रकरणी हरियाणाचे माजीमंत्री, लोकहित पक्षाचे (एचएलपी) नेते तथा उद्योजक गोपाल कांडा यांच्याशी संबंधित गुरुग्राममधील तीन ठिकाणांवर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) गुरुवारी छापे टाकले. निवासस्थान, फार्महाऊस आणि कार्यालयावर हे छापे टाकण्यात आले. चार प्रकल्पांद्वारे ६६१ गुंतवणूकदारांकडून २४८ कोटी रुपयांहून अधिक रक्कम जमा करण्यात आल्याचा ईडीचा दावा आहे. 

ईडीच्या गुरुग्राम कार्यालयाकडून ‘वाटिका लिमिटेड’च्या कथित मोठ्या रिअल इस्टेट गैरव्यवहाराची चौकशी सुरू आहे. व्यावसायिक प्रकल्पांमध्ये गुंतवणूक करण्यास प्रवृत्त करताना वेळेत ताबा देणे, निश्चित परतावा, लीज भाडे तसेच विक्रीखते करून देण्याचे आश्वासन देण्यात आल्याचा तपास यंत्रणेचा आरोप आहे.

तपासानुसार, संबंधित चार प्रकल्पांमध्ये सुमारे ६६१ गुंतवणूकदारांकडून २४८.४६ कोटी रुपये जमा करण्यात आले. मात्र, अद्याप गुंतवणूकदारांना प्रकल्पांचा ताबा देण्यात आलेला नाही किंवा आश्वासनानुसार विक्रीखते करण्यात आलेली नाहीत, असे ईडीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

गुंतवणूकदारांकडून मिळालेल्या निधीच्या आर्थिक व्यवहारांचा मागोवा घेत असताना निधी इतरत्र वळविल्याचा संशय ईडीला आला आहे.  या पार्श्वभूमीवर कांडा यांचे निवासस्थान, फार्महाऊस आणि कार्यालय अशा गुरुग्राममधील तीन ठिकाणी झडती घेण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.  वळविण्यात आलेला निधी कांडा यांच्याशी संबंधित विविध कंपन्यांकडे हस्तांतरित झाल्याचे तपासात समोर आल्याचा ईडीचा दावा आहे.

गोपाल कांडा हे सिरसा मतदारसंघाचे माजी आमदार आहेत. २०२४च्या हरियाणा विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे गोकुल सेतिया यांनी त्यांचा पराभव केला होता. कांडा यांचे वकील अॅड. अरुण खत्री यांनी, ‘‘सध्या ईडीच्या प्रकरणातील तपशील जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत’’, अशी प्रतिक्रिया यावर दिली. 

हेही वाचा
सर्व पहा