पणजी : पर्वरीतील उड्डाणपूल आपल्या मतदारसंघात येत असतानाही या पुलासंदर्भात निर्णय घेताना आपल्याला विश्वासात घेतले नसल्याचा दावा पर्वरीचे आमदार तथा पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी केला आहे. यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री दिगंबर कामत यांच्याशी चर्चा केली असून, या विषयावर तातडीने बैठक घेण्याची मागणी केल्याचेही त्यांनी सांगितले.
उड्डाणपुलाच्या बांधकामामुळे पर्वरीवासियांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागला. त्यामुळे आता या प्रकल्पाचा प्रत्यक्ष लाभ पर्वरीवासियांना मिळणे आवश्यक असल्याचे खंवटे यांचे म्हणणे आहे. उड्डाणपुलासंबंधित निर्णय घेताना आपल्याला विश्वासात घेण्यात आले नसल्याची नाराजीही खंवटे यांनी व्यक्त केली. प्रकल्पाच्या नियोजन आणि निर्णयप्रक्रियेत स्थानिक लोकप्रतिनिधींशी समन्वय आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
उड्डाणपुलाच्या कामामुळे यापू्र्वी पर्वरीवासियांना वाहतूक कोंडी, दैनंदिन प्रवासातील अडचणी आणि स्थानिकांना झालेल्या गैरसोयींच्या पार्श्वभूमीवर प्रकल्पाच्या पुढील नियोजनाबाबत स्पष्टता आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. उड्डाणपुलासंबंधित पुढील निर्णय घेताना पर्वरीतील नागरिकांच्या हिताला प्राधान्य देण्याची मागणीही मंत्री खंवटे यांनी केली.
भीषण अपघातानंतर दुचाकींवर बंदी
दरम्यान; ९ सप्टेंबर रोजी संध्याकाळी पर्वरीतील नव्या उड्डाणपुलाचे केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्याहस्ते उद्घाटन करण्यात आले होते. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी या पुलावर झालेल्या भीषण अपघातात दोघेजण ठार झाले तर दोघे जखमी झाले. या अपघातानंतर सुरक्षेच्यादृष्टीने याठिकाणी काही निर्णय घेण्यात आले. या पुलावरून वाहतूक करण्यास दुचाकींवर बंदी घालण्यात आली. त्यानंतर ‘स्पीड कॅमेरे’ही बसविण्यात आले.


