म्हापसा : पर्वरी येथील निओ मॅजेस्टिक कॅसिनोचे संचालक श्रीनिवास नायक यांच्यावरील गोळीबारप्रकरणी दोन्ही शूटरची व्यवस्था केल्याचा आरोप असलेल्या मध्यस्थ सतीश शिंदे (४८, रा. मुंबई) याला गोवा पोलिसांच्या गुन्हा शाखेने अटक केली आहे. महाराष्ट्राबाहेर पसार होण्याच्या तयारीत असताना मुंबई विमानतळावरून इमिग्रेशन पोलिसांच्या मदतीने त्याला ताब्यात घेण्यात आले. गुरुवारी म्हापसा न्यायालयात हजर केले असता त्याला ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
गोळीबारप्रकरणी अटक केलेले अर्पुथराज ऊर्फ अण्णा पुलराज नदार आणि बाबू ऊर्फ इसार अली यांनी पोलीस चौकशीत हा हल्ला सतीश शिंदे याने दिल्याचा जबाब दिल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्यानंतर गुन्हा शाखा शिंदेच्या मागावर होती. पोलिसांचा ससेमिरा लक्षात आल्यानंतर त्याने मुंबईतून बाहेर पडण्याचा प्रयत्न केल्याचे तपासात समोर आले आहे.
शिंदे मुंबई विमानतळावर पोहोचला असता इमिग्रेशन पोलिसांनी त्याला ताब्यात घेत गोवा पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर गुन्हा शाखेच्या पथकाने बुधवारी रात्री त्याला गोव्यात आणून रीतसर अटक केली. पोलिसांकडून त्याची कसून चौकशी सुरू आहे.
शिंदेच्या पोलीस कोठडीला त्याच्या वतीने अॅड. विनायक पोरोब यांनी विरोध केला. ट्रान्झिट रिमांड न घेता मुंबईहून गोव्यात आणण्यात आल्याचा, तसेच ताब्यात घेतल्यानंतर २४ तासांपेक्षा अधिक कालावधी उलटून गेल्यानंतर न्यायालयात हजर केल्याचा दावा त्यांनी केला. अटकेच्या कारणांची माहिती कुटुंबीयांना कायदेशीर पद्धतीने देण्यात आली नसल्याचाही युक्तिवाद करण्यात आला. सरकारी वकिलांनी हे आरोप फेटाळले.
नायकांवर तीन राऊंड गोळीबार
२८ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री ८.४७ वाजता श्रीनिवास नायक आपल्या निवासस्थानी जाण्यासाठी बाहेर पडले असताना दबा धरून बसलेल्या दोघा हल्लेखोरांनी त्यांच्यावर तीन राऊंड गोळीबार केला. नायक यांच्या अंगरक्षकांनी प्रत्युत्तरादाखल तीन राऊंड फायर केल्यानंतर हल्लेखोर फरार झाले. सुदैवाने नायक या हल्ल्यातून बचावले.
पर्वरी पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम १०९(१), १२५, ३(५) तसेच शस्त्रास्त्र कायद्याच्या कलम ३ आणि २७ अंतर्गत गुन्हा नोंदवला होता. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन तपास गुन्हा शाखेकडे सोपविण्यात आला आहे.
आतापर्यंत सात जणांना अटक
या प्रकरणात गुन्हा शाखेने आतापर्यंत सात जणांना अटक केली आहे. यामध्ये सतीश शिंदे, दोन्ही शूटर अर्पुथराज ऊर्फ अण्णा पुलराज नदार (४९) आणि बाबू ऊर्फ इसार अली (३५), तसेच काझू अलाउद्दीन शेख (२८), इसरार अली अहमद (२५), सूरज उपेंद्र आचार्य (३६) आणि पवन हरी सिंग सौर (१९) यांचा समावेश आहे.


