जनभावना लक्षात घेऊन फेरविचाराची तयारी

विजय सरदेसाई : दबावाखाली येणार नसल्याचेही केले स्पष्ट


17th September, 11:48 pm
जनभावना लक्षात घेऊन फेरविचाराची तयारी

गोवन वार्ता प्रतिनिधी
मडगाव
आम आदमी पक्षासोबत युती केल्यावरून होत असलेल्या टीकेच्या पार्श्वभूमीवर गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी भूमिका स्पष्ट केली. कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता निर्णय घेतला जाईल. गोमंतकीयांच्या भावना आणि हित लक्षात घेऊन राजकीय समीकरणांचा फेरविचार करण्याचा पर्यायही खुला आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोवा फॉरवर्ड आणि आम आदमी पक्षाने ‘गोवा फर्स्ट’ आघाडीची घोषणा केली आहे. भाजप आणि काँग्रेसला पर्याय म्हणून ही आघाडी उभी करण्याचा प्रयत्न असल्याचे दोन्ही पक्षांकडून सांगण्यात आले. मात्र, युतीच्या घोषणेनंतर राजकीय वर्तुळातून, तसेच काही ठरावीक घटकांकडून त्यावर टीका होत आहे. या पार्श्वभूमीवर सरदेसाई यांनी समाजमाध्यमांवरील दबावामुळे निर्णय बदलला जाणार नसल्याचे सांगितले. लोकशाही व्यवस्थेत टीका आणि संवादाला महत्त्व असून, जनतेच्या सूचना व विधायक टीका समजून घेणे आवश्यक आहे. गोव्याचे आणि गोमंतकीयांचे हित हे प्रमुख उद्दिष्ट आहे. जनतेचा सूर वेगळा असल्याचे स्पष्ट झाल्यास त्यांच्या भावनांचा आदर करून राजकीय समीकरणांचा फेरविचार करण्याची तयारीही आहे, असे विजय सरदेसाई यांनी स्पष्ट केले.
काहींचा लढा विरोधी पक्षातील घटकांसोबत : विजय
काँग्रेसने केलेल्या टीकेला उत्तर देताना विजय सरदेसाई म्हणाले, विधानसभेत सरकारच्या निर्णयांवर कुणी टीका केली ते लोकांनी पाहिले. याशिवाय विरोधी पक्ष म्हणून पर्वरी येथील उड्डाणपुलाचा विषय काँग्रेसने हाती घेतला नाही, साखळी मतदारसंघात कोण उमेदवार असेल त्यावर भाष्य केले नाही; पण इतकी वर्षे युतीत असलेल्या पक्षाच्या मतदारसंघात उमेदवार उभे करण्याची तयारी केली, हे दिसून येते. आमचा लढा भाजपच्या विरोधात असून काहींचा लढा हा विरोधी पक्षातील घटकांसोबतच असल्याचे दिसते.