म्हापसा : दोन युवतींचे अपहरण आणि मायलेकाच्या बेपत्ता होण्याच्या दोन स्वतंत्र प्रकरणांचा म्हापसा पोलिसांनी छडा लावला. कर्नाटक व महाराष्ट्रातून चारही जणांची सुखरूप सुटका करण्यात आली. युवतींच्या अपहरणप्रकरणी वाकदोथ वकीला नाईक (२६, बेल्लारी, कर्नाटक) याला अटक करण्यात आली असून त्याची १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली आहे.
५ सप्टेंबर रोजी २२ व १७ वर्षीय दोन बहिणींचे अज्ञात इसमाने अपहरण करून त्यांना डांबून ठेवल्याची तक्रार दाखल झाली होती. म्हापसा पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम १३७(२), १४०(३) व गोवा बाल कायद्याच्या कलम ८ अंतर्गत गुन्हा नोंदवून तपास करत मंगळुरूतील कंकनाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दोन्ही युवतींची सुखरूप सुटका केली. या अपहरण प्रकरणी वाकदोध वकील याला अटक करण्यात आली. संशयिताची १४ दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
अकलूजहून मायलेक परत
११ सप्टेंबर रोजी ३७ वर्षीय महिला आपल्या नऊ वर्षांच्या मुलासह घरातून बेपत्ता झाली होती. तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी अकलूज (सोलापूर) येथून मायलेकाचा शोध घेऊन त्यांना सुखरूप घरी आणले. मानसिक तणावामुळे महिला मुलाला घेऊन घरातून गेल्याचे तपासात समोर आले.
पोलीस अधीक्षक हरिश्चंद्र मडकईकर व उपअधीक्षक आशीष शिरोडकर व निरीक्षक नवीन देसाई यांच्या देखरेखीखाली उपनिरीक्षक सुनील पाटील, मंगेश पाळणी, विराज कोरगावकर, हवालदार सुशांत चोपडेकर, कॉन्स्टेबल साहिल जात्ये, आकाश पाटील, अनिल राठोड, प्रवीण पाटील, श्रुती मांद्रेकर व लता गावडे यांच्या पथकाने ही कामगिरी बजावली आहे.


