‘गोवा फर्स्ट’मुळे भाजप भयभीत : आमदार व्हिएगस

विकासकामांवर काँग्रेसला चर्चेचे आव्हान


17th September, 11:45 pm
‘गोवा फर्स्ट’मुळे भाजप भयभीत : आमदार व्हिएगस

गोवन वार्ता प्रतिनिधी
मडगाव
राज्यात ‘गोवा फर्स्ट’ची स्थापना झाल्याने भाजप धास्तावला आहे. मोफत वीज, दर्जेदार शिक्षण, उत्तम आरोग्य सुविधा आणि बेकायदा जमीन रूपांतरणाला आळा घालण्याच्या भूमिकेमुळे भाजपची झोप उडाली आहे, असा दावा बाणावलीचे आमदार व्हेंझी व्हिएगस यांनी केला.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांच्यासह काँग्रेसवरही त्यांनी टीका केली. भाजप आणि काँग्रेसला जे करता आले नाही, ते ‘गोवा फर्स्ट’ करून दाखवेल. काँग्रेससोबत युती करण्याची इच्छा नसतानाही गोव्याच्या हितासाठी आम आदमी पक्ष आणि गोवा फॉरवर्ड एकत्र आले आहेत. काँग्रेसने म्हादई प्रश्नावर आतापर्यंत काय केले, असा सवाल करताना म्हादई वाचवण्यासाठी मी कर्नाटकात जाऊन लढा दिला आहे, अशी आठवण आमदार व्हिएगस यांनी करून दिली.
काँग्रेसच्या आमदारांना आव्हान देताना व्हिएगस म्हणाले , स्वतःच्या मतदारसंघातील विकासकामांवर समोरासमोर चर्चा करण्याची हिंमत दाखवावी. बाणावली मतदारसंघात ‘आप’ने केलेल्या कामांची बरोबरी कोणीही करू शकत नाही. ‘गोवा फर्स्ट’ला जनतेचा वेळ वाया घालवायचा नाही. काँग्रेसची वाट पाहिली; मात्र आता भाजप आणि काँग्रेस या दोन्ही राष्ट्रीय पक्षांना पर्याय शोधणाऱ्या जनतेसाठी भक्कम पर्याय म्हणून ‘गोवा फर्स्ट’ उभे राहिले आहे, असे व्हिएगस म्हणाले.
राज्यातील सध्याच्या विनाशाला पक्षांतर कारणीभूत आहे. मी कधीही पक्षांतर केले नाही. गोमंतकीय जनता भाजप आणि काँग्रेस पक्षांना कंटाळली असून आगामी निवडणुकीत ती ‘गोवा फर्स्ट’ला संधी देईल.
_ व्हेंझी व्हिएगस, आमदार, आप