हरमल : येथील बामणभाटी येथे कृष्णा रघुवीर नाईक यांच्या राहत्या घराचा दर्शनी दरवाजा फोडून आतील कपाट व अन्य ठिकाणांवरून अंदाजे १० लाख रुपयांचे दागिने व दोन लाख रोख रुपये रोख रक्कम लंपास करण्याची घटना घडली.
काल १६ सप्टेंबर रोजी, रात्री ८ ते ११ दरम्यान ही घरफोडी झाली. घरमालक कृष्णा नाईक रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास घरी परतला असता, घराचा दरवाजा सताड उघडा होता. घरातील सामान अस्ताव्यस्त पडलेले होते. तसेच सुमारे १० लाख रुपयांचे दागिने आणि दोन लाख रुपये गायब असल्याचे दिसून आले. सोन्याच्या दागिन्यात घड्याळाचा बेल्ट,मंगळसूत्र, बांगड्या, अंगठी, सोनसाखळी इत्यादीचा समावेश होता.
चोरी झाल्याचे लक्षात येताच त्यांनी मांद्रे पोलिसांशी संपर्क साधला. रात्री ११ वाजता स्थानकात पोचलो असता, पोलिसांनी सीसीटीव्ही फूटेज घेऊन येण्यास सांगितले. पोलिसांनी कारवाई करण्याऐजवी फूटेज मागितल्याने पोलीस स्थानकच आहे का, असा प्रश्न पडल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले.


