भारताकडून अफगाणिस्तानला ३-० ने ‘क्लिन स्वीप’

१२७ धावांनी दणदणीत विजय : अभिषेक शर्माचे विश्वविक्रमी शतक

Story: गोवन वार्ता । न्यूज डेस्क |
17th September, 11:55 pm
भारताकडून अफगाणिस्तानला ३-० ने ‘क्लिन स्वीप’

नवी दिल्ली : भारताने अरुण जेटली स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या तिसऱ्या आणि अंतिम टी-२० सामन्यात अफगाणिस्तानचा १२७ धावांनी पराभव केला. या विजयासह भारताने तीन सामन्यांची मालिका ३-० ने जिंकत सलग दुसऱ्या टी-२० मालिकेत क्लीन स्वीप केला आहे.
प्रथम फलंदाजी करताना भारताने अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन यांच्या जोरदार फटकेबाजीच्या जोरावर निर्धारित २० षटकांत ७ बाद २२१ धावा केल्या. प्रत्युत्तरात, २२२ धावांच्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना अफगाणिस्तानचा संघ गडगडला. भारताच्या शिस्तबद्ध गोलंदाजीसमोर अफगाणिस्तानचा डाव कोलमडला आणि संपूर्ण संघ निर्धारित लक्ष्यापासून वंचित राहिला.
प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या भारतीय संघाने आक्रमक सुरुवात केली. अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन यांनी अफगाणिस्तानच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. पहिल्या ६ षटकांतच भारताने एकही गडी न गमवता १०० धावांचा डोंगर उभा केला, जी टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यातील पॉवरप्लेमधील सर्वोच्च धावसंख्या ठरली.
अभिषेक शर्माने अवघ्या १६ चेंडूंत आपले अर्धशतक पूर्ण केले आणि त्यानंतर वादळी खेळी सुरू ठेवत फक्त ३० चेंडूंत शतक ठोकत इतिहास रचला. संजू सॅमसननेही ३४ चेंडूंत अर्धशतक झळकावले. पहिल्या १० षटकांत भारताने १४२ धावा केल्या होत्या, मात्र त्यानंतर अफगाणिस्तानच्या गोलंदाजांनी पुनरागमन करत भारताला २२१ धावांवर रोखले. अफगाणिस्तानतर्फे अजमतुल्ला ओमरझाईने २ तर राशिद खानने १ बळी टिपला.


अभिषेक शर्माने मोडले अनेक विक्रम
अभिषेक शर्माने आपल्या या शतकी खेळीदरम्यान अनेक मोठे विक्रम आपल्या नावावर केले. त्याने रोहित शर्माचा सर्वात जलद टी-२० शतक (३५ चेंडू) नोंदवण्याचा विक्रम मोडत अवघ्या ३० चेंडूंत शतक पूर्ण केले. तसेच, पूर्ण सदस्या देशांच्या खेळाडूंमध्ये सर्वात जलद टी-२० शतक झळकावण्याचा विक्रमही त्याने आपल्या नावावर केला. यापूर्वी सिकंदर रझा आणि फिनलन (प्रत्येकी ३३ चेंडू) यांच्या नावावर हा विक्रम होता.
भारताची भेदक गोलंदाजी
२२२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना अफगाणिस्तानची सुरुवात खराब झाली. अक्षर पटेलने रहमानुल्लाह गुरबाज (१५) आणि सिदिकुल्ला अटल यांना एकाच षटकात बाद करत सुरुवातीलाच धक्के दिले. त्यानंतर जसप्रीत बुमराहने दरविश रसूलीला बाद करत अफगाणिस्तानची अवस्था ६ षटकांत ४ बाद ५१ अशी केली. भारताच्या अचूक माऱ्यापुढे अफगाणिस्तानचा डाव सावरू शकला नाही आणि भारताने हा सामना मोठ्या फरकाने जिंकत मालिका आपल्या नावावर केली.
आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमधील सर्वात जलद शतके (पूर्ण सदस्य देश):
३० चेंडू : अभिषेक शर्मा (भारत) विरुद्ध अफगाणिस्तान, दिल्ली, २०२६
३३ चेंडू : सिकंदर रझा (झिम्बाब्वे) विरुद्ध गांबिया, नैरोबी, २०२४
३३ चेंडू : फिन अॅलन (न्यूझीलंड) विरुद्ध दक्षिण आफ्रिका, कोलकाता, २०२६
३५ चेंडू : डेव्हिड मिलर (दक्षिण आफ्रिका) विरुद्ध बांगलादेश, पॉचेफस्ट्रूम, २०१७
३५ चेंडू : रोहित शर्मा (भारत) विरुद्ध श्रीलंका, इंदूर, २०१७
एकाच डावात भारताकडून सर्वाधिक षटकार मारणारे फलंदाज:
१३ षटकार - अभिषेक शर्मा विरुद्ध इंग्लंड, मुंबई (वानखेडे), २०२५
११ षटकार - अभिषेक शर्मा विरुद्ध अफगाणिस्तान, दिल्ली, २०२६
१० षटकार - रोहित शर्मा विरुद्ध श्रीलंका, इंदूर, २०१७
१० षटकार - संजू सॅमसन विरुद्ध दक्षिण आफ्रिका, डर्बन, २०२४
१० षटकार - तिलक वर्मा विरुद्ध दक्षिण आफ्रिका, जोहान्सबर्ग, २०२४
१० षटकार - इशान किशन विरुद्ध न्यूझीलंड, तिरुवनंतपुरम, २०२६