पणजी :पर्वरी उड्डाणपुलावरील दुचाकींची बंदी तसेच इतर निर्बंधांबाबत आयआयएम नागपूरच्या शिफारशीनुसार पुढील निर्णय घेतला जाणार आहे. आयआयएम नागपूरचे तज्ज्ञ फ्लायओव्हरची पाहणी करून सल्ला देतील आणि त्यानंतरच निर्बंधांबाबत अंतिम निर्णय होईल, अशी माहिती राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
उद्घाटनानंतर उड्डाणपुलावर भीषण अपघात झाल्याने दुचाकींना बंदी घालण्यात आली. तसेच बॅरिकेड्स लावून उड्डाणपुलावरील प्रवेश आणि बाहेर पडण्याचे मार्ग बंद करण्यात आले. यामुळे पर्वरीतील रस्त्यांवर वाहतूक कोंडी होऊ लागली आहे.
वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून निर्बंध कमी केले, तर तेथील वाहतूक आणखी धोकादायक होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे तज्ज्ञ संस्थेकडून अभ्यास करून पुढील निर्णय घेण्याचे सार्वजनिक बांधकाम खात्याने ठरवले आहे.
ताशी ६५ किमी वेगमर्यादा, तरीही उल्लंघन
पर्वरी उड्डाणपूल खुला केल्यानंतर त्यावर ताशी ६५ किलोमीटर वेगमर्यादा निश्चित करण्यात आली होती. तरीही बहुतांश वाहनचालकांनी या मर्यादेचे पालन केले नाही. अपघातग्रस्त कार ताशी १०० किलोमीटरपेक्षा अधिक वेगाने आली होती आणि त्यामुळेच हा अपघात झाला.
वेगमर्यादेचे पालन करण्यासाठी विशेष व्यवस्था किंवा यंत्रणा उभारण्याची गरज आहे. फ्लायओव्हरवर रम्बलर बसवणे तांत्रिकदृष्ट्या योग्य ठरणार नाही, असे सार्वजनिक बांधकाम खात्याचे मत आहे.
त्यामुळे तज्ज्ञ संस्थेमार्फत अभ्यास करून पुढील निर्णय घेतला जाणार आहे, अशी सविस्तर माहिती राष्ट्रीय महामार्गाचे (गोवा राज्य) मुख्य अभियंता दत्तप्रसाद कामत यांनी दिली.
आयआयएम नागपूर संस्थेकडे वाहतूक व्यवस्थापन आणि रोड इंजिनीअरिंग क्षेत्रातील तज्ज्ञ आहेत. राष्ट्रीय महामार्ग विभागाने त्यांच्याशी पत्रव्यवहार केला आहे.
हे तज्ज्ञ गोव्यात येऊन पर्वरी फ्लायओव्हरची, विशेषतः अटल सेतू आणि फ्लायओव्हरमधील जोडणीच्या पट्ट्याची पाहणी करणार आहेत.
पाहणीनंतर ते विविध शिफारसी सादर करतील आणि त्या आधारेच दुचाकींना परवानगी द्यायची की नाही याचा निर्णय घेतला जाईल.
बुधवारी रात्री झालेल्या पावसामुळे रस्त्यावर साचलेले पाणी वाहून जाण्यासाठी उपाययोजना करण्यात आल्या आहेत, असे दत्तप्रसाद कामत यांनी सांगितले.
- देशातील प्रमुख महामार्ग तसेच वाहतूक कोंडीच्या समस्यांवर आयआयएम नागपूरने यापूर्वीही उपाय सुचवले आहेत. त्यामुळे गोवा सरकारने या संस्थेसोबत सामंजस्य करार (एमओयू) केला आहे.
- मेरशी जंक्शनवरील वाहतूक कोंडीचा अभ्यास करून अहवाल सादर करण्याची जबाबदारी संस्थेला देण्यात आली आहे.
- मेरशी सर्कलनंतर पर्वरी फ्लायओव्हरचा प्राधान्याने अभ्यास करून आयआयएम नागपूर आपला अहवाल सादर करणार आहे.
वाहतूक कोंडीवर पर्यटन मंत्र्यांची नाराजी
फ्लायओव्हरवर दुचाकींना बंदी असल्याने पर्वरीतील वाहतूक कोंडी कायम आहे. फ्लायओव्हरचे बांधकाम सुरू असताना पर्वरीतील नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले होते.
मात्र, फ्लायओव्हरचे उद्घाटन झाल्यानंतरही नागरिकांच्या त्रासात कोणतीही कमी झालेली नाही. या सद्यस्थितीबाबत पर्वरीचे आमदार तथा पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.


