पेडणेत 'ओंकार' हत्तीचा धुमाकूळ; तांबोशे-मोपा परिसरात शेतीचे मोठे नुकसान

गणेशोत्सवाच्या काळात पेडणेतील तांबोशे-मोपा परिसरात ओंकार हत्तीने पुन्हा प्रवेश करून शेतीचे नुकसान केले आहे. शेतकऱ्यांकडून गोवा-महाराष्ट्र समन्वयाची मागणी.

Story: गोवन वार्ता | प्रतिनिधी |
just now
पेडणेत 'ओंकार' हत्तीचा धुमाकूळ; तांबोशे-मोपा परिसरात शेतीचे मोठे नुकसान

पेडणे : एका बाजूला घरोघरी श्री गणरायाचे आगमन झाले असून चतुर्थीचा मोठा उत्साह सुरू आहे, तर दुसऱ्या बाजूला 'ओंकार' हत्तीने पुन्हा एकदा तांबोशे-मोपा परिसरात प्रवेश केल्याने स्थानिक शेतकऱ्यांची झोप उडाली आहे. १७ सप्टेंबर रोजी सकाळी सुमारे नऊच्या सुमारास ओंकार हत्तीने तांबोशे परिसरात प्रवेश करून शेती व बागायतीचे मोठे नुकसान करण्यास सुरुवात केली. सणाच्या दिवसांतच उभे पीक उद्ध्वस्त होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये भीती आणि तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.



गणपतीची पूजा-आरती करून कुटुंबासोबत सण साजरा करायचा की रात्रंदिवस शेतात उभे राहून पिकांचे रक्षण करायचे, असा उद्विग्न सवाल तांबोशे आणि मोपा येथील शेतकरी उपस्थित करत आहेत. गेल्या वर्षीप्रमाणेच यंदाही मोपा, कडशी, तांबोशे आणि तोरसे परिसरात या हत्तीने वारंवार धुमाकूळ घातला आहे. तेरेखोल नदी ओलांडून तो सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कास परिसरात गेला होता, मात्र तेथून तो पुन्हा गोव्याच्या सीमेत परतल्याने बळीराजाची चिंता अधिकच वाढली आहे.



स्थानिक पंच सदस्य दया गवंडी, सेवानिवृत्त अभियंता विलास तांबोसकर आणि शेतकरी मधुसूदन सामंत यांनी प्रशासनाच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. वनखात्याचे कर्मचारी केवळ हत्तीला एका भागातून दुसऱ्या भागात हुसकावण्यापुरतेच प्रयत्न करत असून, त्यांच्याकडे सक्षम यंत्रणा आणि साधनांचा अभाव असल्याचे दिसून येते. त्यामुळे गोवा आणि महाराष्ट्र सरकारने तातडीने समन्वय साधून प्रशिक्षित तज्ज्ञ व माहुतांची मदत घ्यावी आणि ओंकारचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा, अशी जोरदार मागणी स्थानिकांनी केली आहे. तसेच मिळणारी भरपाई अपुरी व विलंबाने मिळत असल्याने नुकसानग्रस्तांना तातडीने योग्य भरपाई देऊन दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे.

हेही वाचा
सर्व पहा