अंदमानच्या समुद्रातील ज्वालामुखींचे गूढ उकलणार गोव्यातील शास्त्रज्ञ

गोव्यातील 'सीएसआयआर-एनआयओ' आणि 'जीएसआय' हे अंदमान समुद्रातील प्राचीन जलमग्न ज्वालामुखी, त्यांची विवरे आणि सागरी खनिज संपत्तीचा अभ्यास करण्यासाठी संयुक्त 'आरओव्ही' संशोधन मोहीम राबवणार आहेत.

Story: गोवन वार्ता | प्रतिनिधी |
just now
अंदमानच्या समुद्रातील ज्वालामुखींचे गूढ उकलणार गोव्यातील शास्त्रज्ञ

पणजी : अंदमान समुद्राच्या तळाशी दडलेल्या प्राचीन ज्वालामुखींचा आणि त्यांच्या भव्य विवरांचा अभ्यास करण्यासाठी गोव्यातील शास्त्रज्ञांचे एक विशेष पथक सज्ज झाले आहे. या मोहिमेअंतर्गत समुद्राच्या तळाशी असणाऱ्या पर्वतीय संरचना म्हणजेच 'सी-माऊंट्स' आणि तेथील ज्वालामुखींच्या हालचालींमुळे निर्माण झालेल्या खनिजांचा सखोल अभ्यास केला जाणार आहे. यासाठी गोव्यातील ‘सीएसआयआर-राष्ट्रीय समुद्रविज्ञान संस्था’ (NIO) आणि ‘भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण’ (GSI) यांनी एकत्र येत एका संयुक्त मोहिमेची आखणी केली आहे.



नुकत्याच पार पडलेल्या एका महत्त्वपूर्ण कार्यक्रमात जीएसआयच्या सागरी आणि किनारपट्टी सर्वेक्षण विभागाचे उपमहासंचालक डॉ. एन. एम. शरीफ आणि सीएसआयआर-एनआयओचे संचालक प्रा. सुनील कुमार सिंग यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत यासंदर्भातील सामंजस्य करारावर (MoU) स्वाक्षऱ्या केल्या. या वैज्ञानिक मोहिमेसाठी 'रिमोडली ऑपरेटेड व्हेईकल' (ROV) या मानवरहित, दूरस्थपणे नियंत्रित केल्या जाणाऱ्या अत्याधुनिक पाणबुडी तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. ज्या भागात मानवाला प्रत्यक्ष पोहोचणे कठीण किंवा अशक्य असते, अशा सागरी तळाची रचना आणि तेथील ज्वालामुखींच्या अवशेषांचे बारकाईने निरीक्षण करण्याचे काम हे 'आरओव्ही' करणार आहे.


Ancient Underwater Mountain Range Discovered! – Boundless Ocean Of Politics


शास्त्रीय दृष्टिकोनातून, अंदमान समुद्रातील हे 'सी-माऊंट्स' म्हणजे वर्तुळाकार किंवा लंबगोलाकार विवरे (Calderas) असलेले प्राचीन जलमग्न ज्वालामुखी पर्वत आहेत. या संरचनांमधून भूतकाळातील ज्वालामुखींचे उद्रेक, त्यांचा भूपृठ्ठ ढासळण्याची प्रक्रिया आणि सागरी तळाची भूगर्भीय उत्क्रांती याबद्दल अत्यंत महत्त्वाची माहिती मिळण्याची शक्यता आहे. या भूगर्भीय अभ्यासाव्यतिरिक्त, या मोहिमेला एक महत्त्वाचा जैविक पैलूही लाभला आहे. हे जलमग्न पर्वत अद्वितीय अशा खोल सागरी परिसंस्थेला आधार देतात, ज्यामुळे हे भाग जैवविविधतेचे केंद्र ठरतात.


Underwater Volcano Observed - RobinAge


अंदमान समुद्र हा एक सक्रियपणे विकसित होणारा सागरी द्रोणी (Back-arc basin) भाग असून, तो बर्मी-अंदमान-पश्चिम सुंदा टेक्टोनिक प्रणालीचा एक महत्त्वाचा भाग आहे. ही प्रणाली म्यानमारपासून अंदमान-निकोबार भागातून थेट इंडोनेशियापर्यंत विस्तारलेली आहे. या क्षेत्रात 'बॅरेन आयलंड' हा भारतातील एकमेव सक्रिय ज्वालामुखी तसेच 'नारकोंडम' हे सुप्त ज्वालामुखीचे बेट समाविष्ट आहे. भूतकाळातील सागरी भूभौतिकीय अभ्यासांनुसार सुमात्राच्या दक्षिणेकडून बॅरेन आयलंड आणि नारकोंडम क्षेत्राकडे जाणाऱ्या भागात अनेक जलमग्न ज्वालामुखी असल्याचे स्पष्ट झाले आहे. एका अहवालानुसार या भागात २३, तर एका विस्तृत प्रादेशिक विश्लेषणानुसार तब्बल ३३ जलमग्न ज्वालामुखींची नोंद करण्यात आली आहे. या सर्व वैज्ञानिक घटकांचा विचार करता, गोव्यातील शास्त्रज्ञांची ही मोहीम सागरी संशोधन क्षेत्रासाठी अत्यंत मैलाचा दगड ठरणार आहे.


Mineral-laden water emerging from a hydrothermal vent | U.S. Geological  Survey

हेही वाचा
सर्व पहा