मडगाव : कुंकळ्ळी येथील देमानी परिसरात एका बंद घराला लक्ष्य करून अज्ञात चोरट्यांनी खिडकीचे लोखंडी गज कापून आत प्रवेश केला आणि सोन्याचे दागिने तसेच इतर मौल्यवान ऐवज पळवून नेला. भरवस्तीत सणासुदीच्या काळात घडलेल्या या धाडसी चोरीमुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीती आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित घरमालक काही कामा निमित्त बाहेर गेल्यामुळे घर बंद होते. हीच संधी साधून अज्ञातांनी रात्रीच्या सुमारास कटरच्या साहाय्याने खिडकीचे लोखंडी गज कापले आणि घरात प्रवेश मिळवला. चोरट्यांनी घरातील कपाटे उघडून आतील साहित्य अस्ताव्यस्त केले आणि त्यातील सोन्याचे किमती दागिने व अन्य किमती ऐवज घेऊन पोबारा केला. घरमालक परत आल्यानंतर चोरीचा हा प्रकार निदर्शनास आला आणि त्यांनी तातडीने कुंकळ्ळी पोलिसांना घटनेची माहिती दिली.
घटनेचे गांभीर्य ओळखून कुंकळ्ळी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक डायगो ग्रासियस यांच्या नेतृत्वाखालील पथकाने घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा पंचनामा केला. चोरट्यांचा माग काढण्यासाठी पोलीस परिसरातील विविध ठिकाणच्या सीसीटीव्ही फुटेजची बारीक फेरपडताळणी करत आहेत. तसेच तपासाला गती देण्यासाठी श्वानपथक आणि फॉरेन्सिक तज्ज्ञांची मदत घेण्यात आली आहे.
दरम्यान, देमानी आणि आसपासच्या परिसरात वाढत्या चोरीच्या घटनांमुळे स्थानिक रहिवाशांनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे. रात्रीच्या वेळी पोलिसांनी या भागात नियमित गस्त वाढवावी आणि संशयास्पद हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवावे, अशी जोरदार मागणी स्थानिकांनी केली आहे. याप्रकरणी कुंकळ्ळी पोलीस ठाण्यात अज्ञातांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला असून, पोलीस निरीक्षक डायगो ग्रासियस यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील कायदेशीर तपास वेगाने सुरू आहे.


