मडगावात गणपती विसर्जन मिरवणुकीदरम्यान फटाका पडल्याने क्रेटा कार भस्मसात

मडगाव येथे गणपती विसर्जन मिरवणुकीत आतषबाजीदरम्यान एक फटाका रस्त्याकडेला उभ्या असलेल्या कारवर पडल्याने कारने अचानक पेट घेतला. या घटनेत हुंदाई क्रेटा कार पूर्णपणे जळाली.

Story: गोवन वार्ता | प्रतिनिधी |
just now
मडगावात गणपती विसर्जन मिरवणुकीदरम्यान फटाका पडल्याने क्रेटा कार भस्मसात

मडगाव : घोगळ येथील जुन्या चौगुले कॉलेजजवळ गणपती विसर्जन मिरवणुकीच्या जल्लोषात सुरू असलेल्या आतषबाजीदरम्यान एक फटाका रस्त्याकडेला उभ्या असलेल्या एका हुंदाई क्रेटा कारवर जाऊन पडल्याने कारने अचानक पेट घेतला. या आगीमुळे काही वेळातच संपूर्ण कार भस्मसात झाली. या दुर्घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.

कारच्या आतून धूर निघत असल्याचे लक्षात येताच उपस्थितांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला, मात्र कारच्या बंद खिडक्या आणि आतील प्लास्टिक घटकांमुळे आगीने काही मिनिटांतच रौद्ररूप धारण केले. सुदैवाने, आग लागली तेव्हा कारच्या आत कोणीही उपस्थित नसल्यामुळे मोठी जीवितहानी टळली.

अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, रात्री सुमारे १२:२५ वाजण्याच्या सुमारास चौगुले कॉलेजजवळ एका कारने पेट घेतल्याचा आपत्कालीन फोन कॉल अग्निशामक केंद्राला प्राप्त झाला. माहिती मिळताच अग्निशामक दलाचे वाहन तातडीने रवाना झाले आणि अवघ्या तीन मिनिटांत जवान घटनास्थळी दाखल झाले.

जवानांनी वेळ न दवडता तात्काळ वॉटर होझ पाईपच्या साहाय्याने अग्निशामक मोहीम सुरू केली. काही वेळातच आग पूर्णपणे विझवून परिस्थिती पूर्ण नियंत्रणात आणण्यात आली.या घटनेत वाहनाचे नेमके किती आर्थिक नुकसान झाले आहे, याचा प्राथमिक अंदाज लावला जात असून मडगाव पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.


हेही वाचा
सर्व पहा