विलास मेथर खून प्रकरणातील संशयिताला दुबईवारीची परवानगी

शैलेश शेट्टीला २५ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबरपर्यंत प्रवासाची मुभा

Story: गोवन वार्ता। प्रतिनिधी |
18th September, 11:41 pm
विलास मेथर खून प्रकरणातील संशयिताला दुबईवारीची परवानगी

पणजी : तोर्डा-पर्वरी येथील सामाजिक कार्यकर्ते विलास मेथर खून प्रकरणातील संशयित उद्योजक शैलेश शेट्टी याला दुबईला जाण्यास तसेच पासपोर्ट १० वर्षांसाठी नूतनीकरण करण्यास म्हापसा येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने परवानगी दिली. याबाबतचा आदेश अतिरिक्त सत्र न्यायाधीश रैना फर्नांडिस यांनी दिला.
विलास मेथर यांच्यावर १४ ऑक्टोबर २०२० रोजी पेट्रोल मिश्रित द्रव टाकून जिवंत जाळण्यात आले होते. या प्रकरणी पर्वरी पोलिसांनी बिल्डर अल्ताफ शब्बीर यारगट्टी, खय्याद शेख, पवन श्रीकांत बडिगर, प्रशांत लक्ष्मण दाभोळकर, इक्बाल नानपूरी, संतोष पिल्लाई आणि शैलेश शेट्टी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून अटक केली होती. १४ जानेवारी २०२१ रोजी भारतीय दंड संहितेच्या कलम ३०२ आणि १२०-ब अंतर्गत ५०९ पानी आरोपपत्र दाखल केले आहे. त्यात ७१ साक्षीदारांची नोंद आहे. शेट्टीला सशर्त जामीन मंजूर करताना परदेश प्रवासावर बंदी घालण्यात आली होती.
‍या पार्श्वभूमीवर उच्च न्यायालयाच्या निवाड्यांचा संदर्भ घेत पासपोर्ट नूतनीकरणावर कायदेशीर बंदी नसल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. त्यानंतर शेट्टीला २५ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबरदरम्यान दुबई प्रवासाची आणि पासपोर्ट १० वर्षांसाठी नूतनीकरण करण्याची परवानगी देण्यात आली.
पूर्वीही चार वेळा प्रवासाची परवानगी
शेट्टीने व्यावसायिक कारणासाठी २५ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबरदरम्यान दुबईला जाण्याची परवानगी मागितली होती. सरकारी वकिलांनी तो परदेशात पळून जाण्याची शक्यता असल्याचा दावा करत अर्जाला विरोध केला. मात्र, शेट्टीला यापूर्वी २०२२, २०२४, २०२५ आणि जानेवारी २०२६ मध्ये परदेश प्रवासाची परवानगी मिळाल्याचे न्यायालयाने नमूद केले. दुबईची विमान तिकिटे आणि हॉटेल बुकिंगचे पुरावेही सादर करण्यात आले होते.