दार्जिलिंग : पश्चिम बंगालमधील प्रसिद्ध पर्यटन स्थळ दार्जिलिंग येथे हनिमूनसाठी आलेल्या एका नवविवाहित जोडप्याच्या आनंदावर क्षणात विरजण पडले आहे. सित्तॉन्ग येथील एका होमस्टेमध्ये बारबेक्यू करत असताना अचानक आगीचा भडका उडाल्याने महिला ६० टक्के भाजली असून तिच्यावर सिलीगुडी येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या संपूर्ण धक्कादायक घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
उत्तर दिनाजपूर जिल्ह्यातील चोप्रा येथील रहिवासी सौविक दास आणि निकिता यांचा महिनाभरापूर्वीच विवाह झाला होता. हनिमूनसाठी हे जोडपे दार्जिलिंगमधील सित्तॉन्ग येथील एका होमस्टेमध्ये उतरले होते. १३ सप्टेंबर रोजी रात्रीच्या वेळी त्यांनी होमस्टेकडे बारबेक्यूची सोय करण्याची विनंती केली होती. होमस्टेचा एक कर्मचारी बारबेक्यूवर मका भाजत असताना त्याने आगीची तीव्रता वाढवण्यासाठी अचानक एका बाटलीतील तेल आगीवर टाकले. दुर्दैवाने या तेलाच्या थेंबांमुळे आग थेट शेजारी उभ्या असलेल्या निकिता यांच्या अंगावर आल्यामुळे त्या क्षणात आगीच्या ज्वालांमध्ये वेढल्या गेल्या.
सीसीटीव्ही फुटेजमध्ये ही भीषण घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. पत्नीला वाचवण्यासाठी पती सौविक तातडीने तिच्याकडे धावला, ज्यामध्ये त्याच्या हातालाही आगीच्या झळा लागल्या. आगीचा भडका उडाल्यानंतर घाबरलेला कर्मचारी सुरुवातीला पळून गेला, मात्र नंतर त्याने स्वतःचा टी-शर्ट काढून आग विझवण्याचा प्रयत्न केला.
या दुर्घटनेनंतर होमस्टे व्यवस्थापनाच्या ढिसाळ कारभारावर पतीने गंभीर आरोप केले आहेत. होमस्टेमध्ये प्रथमोपचाराची कोणतीही सुविधा उपलब्ध नव्हती, तसेच रुग्णालयात नेण्यासाठी त्वरित वाहनही मिळाले नाही. तासनतास वाट पाहिल्यानंतर अखेर रुग्णवाहिकेची सोय झाली आणि निकिताला सिलीगुडी येथे उपचारासाठी हलवण्यात आले. याप्रकरणी पतीने पोलिसांत अधिकृत तक्रार दाखल केली असून निष्काळजीपणा करणाऱ्यांवर कडक कारवाईची मागणी केली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.


