गणपतीमुळे कदंबच्या आंतरराज्य गाड्या रद्द; प्रवाशांची गैरसोय

गणेशोत्सवाच्या पाचव्या दिवशी कर्मचाऱ्यांच्या टंचाईमुळे कदंब महामंडळाच्या कोल्हापूर आणि मिरज मार्गावरील बसेस रद्द करण्यात आल्या.

Story: गोवन वार्ता | प्रतिनिधी |
just now
गणपतीमुळे कदंबच्या आंतरराज्य गाड्या रद्द; प्रवाशांची गैरसोय

पणजी : गणेशोत्सवाच्या पाचव्या दिवशी चालक आणि वाहक (कंडक्टर) पुरेसे उपलब्ध नसल्यामुळे शुक्रवारी कदंब वाहतूक महामंडळाला कोल्हापूर आणि मिरज मार्गावर जाणाऱ्या आपल्या आंतरराज्य बसेस अचानक रद्द कराव्या लागल्या. ऐन मोक्याच्या वेळी गाड्या रद्द झाल्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली असून त्यांना पर्याय म्हणून महाराष्ट्र व कर्नाटक राज्यांच्या बसेससह खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागला.

कदंब महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक रोहन कासकर यांनी यासंदर्भात माहिती देताना सांगितले की, गणेशोत्सवाच्या काळात चालक, वाहक आणि इतर तांत्रिक कर्मचारी सुट्टीवर जातात. विशेषतः चतुर्थीच्या दुसऱ्या आणि पाचव्या दिवशी कर्मचाऱ्यांची ही उणीव प्रकर्षाने जाणवते. सध्या महामंडळात कर्मचाऱ्यांची टंचाई असून लवकरच नवीन नोकरभरती केली जाणार आहे. शुक्रवारी ऐनवेळी कर्मचाऱ्यांची सोय करणे शक्य न झाल्याने तुलनेने कमी गर्दी असलेल्या कोल्हापूर व मिरज मार्गावरील गाड्या रद्द करण्याचा निर्णय घ्यावा लागला.

झालेली गैरसोय दूर करण्यासाठी उपलब्ध कर्मचाऱ्यांच्या मदतीने अतिरिक्त गाड्यांचे नियोजन करण्यात आले. तसेच सुट्टीवर असलेल्या चालकांना संपर्क साधून कर्तव्यावर बोलावून घेण्यात आले. जास्त प्रवासी संख्या असलेल्या मार्गांना यावेळी प्राधान्य देण्यात आले होते. कदंब महामंडळातर्फे मुंबई, पुणे, बंगळुरू, बेळगाव आणि हुबळी अशा विविध मार्गांवर आंतरराज्य बसेस चालवल्या जातात. शनिवारी गणेशोत्सव संपल्यानंतर सर्व बसेस पूर्वीच्या नियोजनानुसार नियमितपणे धावतील, असे आश्वासन प्रशासनाने दिले आहे.

हेही वाचा
सर्व पहा