भाजप सरकारचा गैरकारभार उघड करणे हेच आमचे ध्येय : विजय सरदेसाई

फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई यांनी भाजपच्या अपयशावर बोट ठेवताना जनतेची भावना महत्त्वाची असल्याचे सांगितले, तर काँग्रेस सहप्रभारी डॉ. अंजली निंबाळकर यांनी गोवा फॉरवर्ड आणि 'आप'ला भाजपची 'बी' टीम म्हणत जोरदार निशाणा साधला.

Story: गोवन वार्ता | प्रतिनिधी |
just now
भाजप सरकारचा गैरकारभार उघड करणे हेच आमचे ध्येय : विजय सरदेसाई

पणजी : गोव्याच्या राजकीय पटावर विरोधी पक्षांमध्ये अंतर्गत आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असून राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर गोवा फॉरवर्ड पार्टीचे अध्यक्ष तथा आमदार विजय सरदेसाई यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट करताना मुख्य ध्येय सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचे प्रशासकीय अपयश उघड करणे हेच असल्याचे सांगितले आहे. विरोधी पक्षातील नेत्यांच्या वक्तव्यांवर प्रतिक्रिया देऊन आपली ऊर्जा वाया घालवण्याचा कोणताही उद्देश नसल्याचे स्पष्ट करत त्यांनी सत्ताधाऱ्यांविरोधात लढा तीव्र करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

काँग्रेस आणि भाजप या दोन्ही प्रमुख पक्षांकडून एकाच वेळी होणाऱ्या टीकेला उत्तर देताना सरदेसाई यांनी राजकीय समीकरणांवर भाष्य केले. सत्ताधारी आणि मुख्य विरोधी पक्ष मिळून जेव्हा एकाच वेळी दुसऱ्या एका पक्षाला लक्ष्य करतात, तेव्हा तो पक्ष राजकीयदृष्ट्या योग्य मार्गावर असल्याचे सिद्ध होते, असा युक्तिवाद त्यांनी केला. गोव्यात पडद्यामागून कोण कोणासोबत युती किंवा 'जॉइंट व्हेंचर' चालवत आहे, याची पूर्ण कल्पना जनतेला आहे. काँग्रेस नेत्यांकडून होणारी वक्तव्ये ही केवळ एक घाईघाईत दिलेली प्रतिक्रिया असून अशा कोणत्याही राजकीय धमक्यांना किंवा दबावाला आपण बळी पडणार नाही, असे त्यांनी ठामपणे नमूद केले. आपण मतदारसंघात सातत्याने जनतेच्या संपर्कात राहणारे लोकप्रतिनिधी असल्याने जनतेच्या भावनांची आपल्याला पूर्ण जाणीव असल्याचे त्यांनी सांगितले.

काँग्रेस नेते गिरीश चोडणकर यांच्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर सरदेसाई यांनी थेट भाष्य करणे टाळले. गिरीश चोडणकर हे आपले मतदार असून आपल्याला त्यांचा मतदार म्हणून पाठिंबा हवा आहे, असा मिश्किल टोला त्यांनी लगावला. शेवटी गोव्यातील जनतेची भावना आणि इच्छाच सर्वोच्च राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पक्षांतर्गत अस्वस्थतेवर बोलताना त्यांनी लोकशाही चौकटीचा हवाला दिला. पक्षात किंवा कुटुंबात मतभेद असणे स्वाभाविक असून तीच लोकशाहीची ताकद असते. सध्या कोणत्याही निवडणुका जाहीर झालेल्या नसून योग्य वेळी चर्चा करून सुधारणा करण्यास पक्ष नेहमी तयार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

राज्यातील रस्त्यांची बिकट अवस्था, दररोज होणारी वाहतूक कोंडी, भ्रष्टाचाराचे आरोप आणि 'कॅश फॉर जॉब' घोटाळ्यावरून त्यांनी भाजप सरकारवर कडक शब्दांत ताशेरे ओढले. राज्यभरात जनता विविध समस्यांमुळे त्रस्त असून सरकारचे अपयश उघडे पडले आहे. अशा स्थितीत सर्व विरोधकांनी एकत्र येऊन सरकारला धारेवर धरणे गरजेचे असताना दुर्दैवाने विरोधकच आपापसात लढत आहेत, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. तरीही आपण जनतेच्या पाठीशी उभे राहून भाजपच्या भ्रष्ट कारभाराचा पर्दाफाश करतच राहू, असा पुनरुच्चार त्यांनी केला.

गोवा फॉरवर्ड आणि आप भाजपची बी टीम : डॉ. अंजली निंबाळकर 

दुसरीकडे, गोवा फॉरवर्डच्या या भूमिकेवर काँग्रेसने अतिशय आक्रमक आणि कडक शब्दांत प्रत्युत्तर दिले आहे. काँग्रेसच्या गोवा सहप्रभारी डॉ. अंजली निंबाळकर यांनी गोवा फॉरवर्ड पार्टी आणि आम आदमी पक्ष या दोन्ही पक्षांवर जोरदार हल्लाबोल केला. हे दोन्ही पक्ष गोमंतकीयांच्या हितासाठी काम करत नसून ते भारतीय जनता पक्षाच्या 'बी' टीम्स म्हणून केवळ स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी कार्यरत असल्याचा गंभीर आरोप निंबाळकर यांनी केला.

सोशल मीडियाद्वारे प्रसिद्ध केलेल्या आपल्या निवेदनात डॉ. अंजली निंबाळकर यांनी विजया सरदेसाई यांच्यावर वैयक्तिक टीका केली. विजया सरदेसाई हे सध्या राजकीयदृष्ट्या घाबरलेले दिसत असून त्यांच्याकडे स्पष्टीकरणासाठी शब्द उरलेले नाहीत, असे त्या म्हणाल्या. २०१७ च्या विधानसभा निवडणुकीनंतर सत्तेत राहण्याच्या लाभासाठी काँग्रेसची साथ सोडून भाजपसोबत हातमिळवणी करणारे सरदेसाई हेच होते, याची आठवण त्यांनी करून दिली. सरदेसाई यांच्या राजकीय भूमिकेमुळे जनता आता त्यांच्या पाठीशी राहिलेली नाही आणि येत्या निवडणुकीत ते आपली हक्काची फातोर्डा येथील जागाही गमावतील, असा दावा निंबाळकर यांनी केला.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांच्या भूमिकेचे समर्थन करत निंबाळकर यांनी काँग्रेस पक्षाची निवडणूक रणनीती स्पष्ट केली. येणाऱ्या निवडणुकीत काँग्रेस पक्ष कोणत्याही तडजोडीशिवाय प्रत्येक जागेवर विजयाच्या ध्येयाने उतरणार आहे. भाजप आणि त्यांना पडद्यामागून मदत करणाऱ्या 'बी' टीम्सचा पराभव करण्यासाठी काँग्रेस पूर्ण ताकदीने मैदानात उतरेल, असा इशारा त्यांनी दिला. या परस्परविरोधी वक्तव्यांमुळे गोव्याच्या राजकारणात विरोधी पक्षांमधील दरी अधिक रुंदावली असून निवडणुकीच्या तोंडावर राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे.

हेही वाचा
सर्व पहा