फोंडा : गोव्यातील महामार्गांवर सुरक्षेचे अपघातांची मालिका सुरूच असून दोन वेगवेगळ्या दुर्घटनांमध्ये निष्काळजीपणाचा मोठा फटका प्रवाशांना बसला आहे. केरये, खांडेपार महामार्गावर रस्त्याकडेला उभ्या असलेल्या बंद ट्रकला मागून येणाऱ्या दुचाकीची जोरदार धडक बसून झालेल्या अपघातात एका नागरिकाचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला, तर अन्य एक जण गंभीर जखमी झाला आहे. वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष आणि सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन यामुळेच हा अपघात घडल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित ट्रक सकाळी सुमारे ११ वाजल्यापासून महामार्गावर बंद पडलेल्या अवस्थेत उभा होता. नियम आणि कायद्यानुसार महामार्गावर एखादे वाहन बंद पडल्यास किंवा दुरुस्तीसाठी उभे असल्यास मागून येणाऱ्या वाहनांना लांबूनच अंदाज यावा यासाठी रिफ्लेक्टिव्ह सायनाबोर्ड किंवा धोक्याचा इशारा देणारा बोर्ड लावणे बंधनकारक असते. मात्र, ट्रकचालक किंवा मालकाने कोणतीही सुरक्षेची उपाययोजना केली नव्हती. दरम्यान, महामार्गावरून प्रवास करणारी दुचाकी समोर अचानक आलेल्या या अडथळ्यामुळे ट्रकला मागून जाऊन धडकली. या अपघाताच्या वेळी दुचाकीवर दोन जण स्वार होते. अपघाताची धडक इतकी तीव्र होती की एकाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसऱ्या गंभीर जखमी व्यक्तीला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले.
घटनास्थळी उपस्थित असलेल्या रॉकी नावाच्या प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार, वाहन उत्पादक कंपन्यांकडून आपत्कालीन प्रसंगासाठी रिफ्लेक्टिव्ह बोर्ड दिले जातात. जर योग्य वेळी हा बोर्ड लावला गेला असता, तर दुचाकीचालकाच्या ही बाब वेळीच लक्षात आली असती आणि हा निष्पाप जीव वाचू शकला असता.
दुसरीकडे, मोले-दूधसागर राष्ट्रीय महामार्गावरही अवजड वाहनांच्या अपघातांचे सत्र सुरूच असून शुक्रवारी गोव्यातून कर्नाटकाच्या दिशेने जाणारा एक १६ चाकी ट्रक अनियंत्रित होऊन रस्त्याकडेला उलटल्याची घटना घडली. या अपघातात ट्रकचे मोठे नुकसान झाले असले तरी सुदैवाने कोणतीही जीवितहानी किंवा गंभीर दुखापत झालेली नाही. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला.
या घटनेनंतर स्थानिक रहिवाशांनी प्रशासनाच्या ढिसाळ कारभारावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. मोले तपासणी नाक्यावर (Checkpost) अवजड आणि ओव्हरलोड वाहनांची योग्य प्रकारे वजन तपासणी न करताच त्यांना पुढे जाण्याची परवानगी दिली जात असल्याचा गंभीर आरोप स्थानिकांनी केला आहे. क्षमतेपेक्षा जास्त वजन वाहून नेणाऱ्या गाड्यांमुळे महामार्गावर अपघातांचा धोका वाढला असून प्रशासनाने चेकपोस्टवर कडक तपासणी करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी आक्रमक मागणी स्थानिकांनी केली आहे. तसेच माडापई, माशेल येथे जंक्शनवर झालेल्या अपघातात एक युवती किरकोळ जखमी झाली.


