मॉडिफाईड सायलेन्सर्सविरोधात ऑगस्टपर्यंत ३३७ गुन्हे दाखल

दक्षिण गोवा पोलिसांची कारवाई : फातोर्ड्यात सर्वाधिक ११४ प्रकरणे

Story: गोवन वार्ता। प्रतिनिधी |
18th September, 11:43 pm
मॉडिफाईड सायलेन्सर्सविरोधात ऑगस्टपर्यंत ३३७ गुन्हे दाखल

मडगाव : दुचाकींवर अनधिकृतरीत्या बसवण्यात येणाऱ्या मॉडिफाईड सायलेन्सर्सविरोधात दक्षिण गोवा वाहतूक पोलिसांनी कारवाई तीव्र केली आहे. ऑगस्टअखेरपर्यंत या प्रकरणी ३३७ गुन्हे नोंदवण्यात आले असून, गेल्या वर्षी याच कालावधीत २३० गुन्हे दाखल झाले होते.दक्षिण गोवा वाहतूक शाखेचा अतिरिक्त कार्यभार सांभाळणारे पोलीस अधीक्षक राजेंद्र प्रभुदेसाई यांनी दिलेल्या माहितीनुसार, विभागनिहाय कारवाईत फातोर्डा येथे सर्वाधिक ११४ गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. त्यानंतर वास्को ७७, मडगाव ६३, फोंडा ३१, कोलवा २९, काणकोण २० आणि केपे येथे ३ गुन्ह्यांची नोंद झाली आहे.
अनधिकृत एक्झॉस्ट सिस्टम किंवा मॉडिफाईड सायलेन्सर्समुळे मोठ्या प्रमाणात ध्वनी प्रदूषण होत असून, त्याचा वृद्ध नागरिक, लहान मुले तसेच इतर नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे अशा सायलेन्सर्सविरोधातील मोहीम यापुढेही सुरूच राहणार असल्याचे प्रभूदेसाई यांनी स्पष्ट केले.
कारवाईदरम्यान अनेक दुचाकी अडवून त्यांचे मॉडिफाईड सायलेन्सर्स जप्त करण्यात आले आहेत. संबंधित वाहनधारकांविरुद्ध कायदेशीर कारवाई केली जात आहे. बंदी असतानाही काही स्थानिक गॅरेज व वर्कशॉपमध्ये पैशांच्या मोबदल्यात वाहनांमध्ये अनधिकृत बदल केले जात असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे बेकायदेशीर सायलेन्सर्स बसवून देणाऱ्या गॅरेज मालक आणि मेकॅनिकवरही कारवाई केली जात आहे. वाहने जप्त करणे, दंड आकारणे तसेच बेकायदेशीर सायलेन्सर्स बसवण्यासाठी जबाबदार असलेल्या व्यक्तींवर गुन्हे दाखल करणे, अशा सर्व स्तरांवर कारवाई सुरू आहे, अशी माहिती वरिष्ठ वाहतूक पोलीस अधिकार्‍याने दिली.
मडगावात ६३ गुन्हे दाखल
मडगाव वाहतूक कक्षाचे पोलीस निरीक्षक संजय दळवी यांनी सांगितले की, ऑगस्टअखेरपर्यंत मडगाव शहरात ६३ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ऑगस्ट महिन्यात विशेष मोहीम राबवून ७ मॉडिफाईड सायलेन्सर्स जप्त करण्यात आले.‍
१० हजारांपर्यंत दंडाची तरतूद
मोटार वाहन कायदा, १९८८ मधील कलम १९०(२) अंतर्गत ही कारवाई करण्यात येत आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना १० हजार रुपयांपर्यंत दंड तसेच वाहन जप्तीसारख्या अन्य कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागू शकते. अनधिकृत बदल करून मॉडिफाईड सायलेन्सर्स बसवू नयेत, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी युवा दुचाकीस्वारांना केले आहे. ध्वनी प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि वाहतूक नियमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी ही मोहीम पुढेही सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.