पणजी :मंत्रिमंडळातील संभाव्य खांदेपालट, उमेदवारी आणि एसटी आरक्षणामुळे सत्ताधारी भाजपमधील अनेक नेते आधीच अस्वस्थ असताना, आता यात पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांचीही भर पडली आहे. पर्वरी उड्डाणपुलाच्या मुद्द्यावरून आपल्याला विश्वासात घेतले जात नसल्याचे सांगत त्यांनी उघड नाराजी व्यक्त केल्याने सत्ताधारी गोटातील अंतर्गत खदखद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे.
कृषिमंत्री रवी नाईक यांच्या निधनाला आता वर्ष पूर्ण होणार आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर फोंडा पोटनिवडणूक रद्द झाली. मात्र, रवी नाईक यांच्या जागी अद्याप अन्य कोणत्याही आमदाराला मंत्रिपद देण्यात आलेले नाही.
चतुर्थीनंतर एका आमदाराचा शपथविधी होणार असल्याचे संकेत मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. यात आमदार दिलायला लोबो आणि आमदार संकल्प आमोणकर यांची नावे चर्चेत असल्याने आमदार आणि मंत्र्यांमधील अस्वस्थतेत आणखी भर पडली आहे.
मंत्रिपद गेल्यानंतर नाराज असलेल्या आमदार नीलेश काब्राल यांनी, भाजपची उमेदवारी घ्यायची की नाही, यावर दोनदा विचार करावा लागेल, अशी भूमिका मांडली आहे. यावर, नीलेश काब्राल हे काँग्रेसमधून भाजपमध्ये आले होते आणि इतर इच्छुकांना डावलून २०१२ मध्ये पक्षाने त्यांना उमेदवारी दिली होती, याची आठवण प्रदेश भाजप अध्यक्ष दामू नाईक यांनी त्यांना करून दिली.
खांदेपालटामुळे अनेक नेते नाराज
नीलेश काब्राल यांचे मंत्रिपद काढल्यानंतर आलेक्स सिक्वेरा यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला. त्यानंतर कला अकादमीच्या नूतनीकरणावर झालेल्या आरोपांमुळे गोविंद गावडे यांचे मंत्रिपद काढण्यात आले आणि त्यांच्या जागी रमेश तवडकर यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला. त्यामुळे आमदार गोविंद गावडे हेही अस्वस्थ आहेत.
दुसरीकडे, प्रकृतीच्या कारणामुळे आलेक्स सिक्वेरा यांनी मंत्रिपद सोडले आणि त्यांच्या जागी दिगंबर कामत यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला. तसेच, आलेक्स सिक्वेरा यांचा नुवे मतदारसंघ एसटीसाठी राखीव होण्याची शक्यता असल्याने तेही अस्वस्थ आहेत.
एकंदरीतच गोविंद गावडे, आलेक्स सिक्वेरा, नीलेश काब्राल आणि सुभाष फळदेसाई यांनी यापूर्वीच आपली नाराजी व्यक्त केली असून, आता पर्वरी फ्लायओव्हरच्या मुद्द्यावरून रोहन खंवटे यांची नाराजीही उघड झाली आहे.
- पर्वरीतील वाहतूक कोंडी दूर करण्याच्या उद्देशाने पर्वरी उड्डाणपुलाचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता.
- फ्लायओव्हरचे काम पूर्ण होऊन त्याचे उद्घाटनही झाले. मात्र, प्रवेश आणि बाहेर पडण्याचे मार्ग बंद केल्यामुळे फ्लायओव्हरचा पर्वरीकरांना अपेक्षित लाभ मिळत नाही.
- फ्लायओव्हरच्या बांधकामादरम्यान पर्वरीकरांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले. आता त्याचा कोणताही लाभ होत नसल्याने पर्यटन मंत्री आणि स्थानिक आमदार रोहन खंवटे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. बैठक बोलावून लवकरात लवकर उपाय काढण्याची मागणी त्यांनी केली आहे.
सांगे मतदारसंघ एसटीसाठी राखीव झाल्यास काय करायचे, हा प्रश्न मंत्री सुभाष फळदेसाई यांच्यासमोर आहे. राजकीय भवितव्याबाबत अस्वस्थ असलेल्या फळदेसाई यांनी कुडचडे मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची चाचपणी सुरू केली आहे.
तसेच, सावर्डे मतदारसंघातून संकेत आर्सेकर निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याने सभापती गणेश गावकर यांच्यासमोरही राजकीय पेच निर्माण झाला आहे.


