पणजी :राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अहवालानुसार मुरगाव तालुक्यातील वास्को आणि बायणा परिसरात वायू प्रदूषण वाढत असून त्याचा थेट परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. गेल्या दोन आर्थिक वर्षांत चिखली, कुठ्ठाळी, कासावली आणि वास्को येथील आरोग्य केंद्रांमध्ये अस्थमा, सीओपीडी, टीबी आणि फुफ्फुसाच्या कर्करोगाच्या रुग्णांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे.
आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये चिखली उपजिल्हा रुग्णालयात अस्थमाचे १० तर सीओपीडीचे २०० रुग्ण होते. २०२५-२६ मध्ये ही संख्या वाढून अनुक्रमे ४३ आणि ६०९ इतकी झाली.
तसेच कुठ्ठाळी आणि कासावली या प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये एका वर्षात अस्थमाच्या रुग्णांमध्ये २१ ने वाढ झाली. या दोन आर्थिक वर्षांत या दोन्ही आरोग्य केंद्रांमध्ये प्रत्येकी ४६ रुग्णांनी सीओपीडीसाठी उपचार घेतले.
सीओपीडी या आजारामुळे फुफ्फुसावर परिणाम होऊन श्वास घेण्यास अडथळा निर्माण होतो.
या कालावधीत वरील चारही रुग्णालयांत फुफ्फुसाच्या कर्करोगाचे ३ रुग्ण आढळले. २०२२ ते २०२५ दरम्यान वास्को वगळता मुरगाव तालुक्यात टीबीचे ८३५ रुग्ण (महिन्याला सरासरी १७) आढळले.
याच काळात वास्को शहरात टीबीचे ४३२ रुग्ण (महिन्याला सरासरी ९) आढळून आले. गेल्या चार वर्षांच्या कालावधीत मुरगाव तालुक्यातील ७,८९२ रुग्णांनी श्वसनसंस्थेशी निगडित आजारांवर गोवा वैद्यकीय महाविद्यालयात (गोमेकॉ) उपचार घेतले आहेत. याचाच अर्थ दरमहा सरासरी १४३ रुग्णांवर गोमेकॉत उपचार झाले.
प्राप्त माहितीनुसार, २०२२ मध्ये गोमेकॉमध्ये मुरगाव तालुक्यातील १,२९५ रुग्णांनी श्वसनसंस्थेशी संबंधित आजारांवर उपचार घेतले होते. २०२४ मध्ये ही संख्या वाढून २,१८९ झाली.
गेल्या तीन वर्षांत गोमेकॉमध्ये फुफ्फुसाच्या कर्करोगाचे १८९, सीओपीडीचे १,५०१ तर अस्थमाच्या २५७ रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत.
प्रदूषण नियंत्रणासाठी उपाययोजना
- वायू प्रदूषण कमी करण्याच्या संदर्भात राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने विविध उपाययोजना सुचवल्या असून, मुरगाव बंदर प्राधिकरणाद्वारे त्याची अंमलबजावणी केली जात आहे.
- यात पाणी शिंपडणे, बंद कन्व्हेयर प्रणाली, अंतर्गत रस्त्यांची स्वच्छता, यांत्रिक हाताळणी, मालावर आच्छादन घालणे, हवा रोधक भिंतींची उभारणी तसेच हवेची गुणवत्ता मोजणाऱ्या केंद्रांची स्थापना आदींचा समावेश आहे.
- या उपाययोजनांची योग्य अंमलबजावणी होत आहे की नाही, याची खात्री मंडळाकडून केली जात आहे.


