पेडणे : तुये–आरोबा–धारगळ मार्गावरील जुन्या आणि अरुंद पूलाचा काही भाग कोसळल्याने वाहनचालक आणि स्थानिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. पूल आधीपासूनच अरुंद असल्याने दोन वाहने एकाच वेळी समोरासमोर आल्यास त्यांना पुढे जाण्यास मोठी कसरत करावी लागते. त्यातच पुलाचा काही भाग कोसळल्याने अपघाताचा धोका आणखी वाढला आहे.
विशेषतः रात्रीच्या वेळी या ठिकाणी धोका अधिक जाणवत आहे. पुलावरून ये-जा करणाऱ्या वाहनचालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. अरुंद पूल आणि खराब झालेला भाग यामुळे वाहनचालकांना सावधगिरीने मार्गक्रमण करावे लागत आहे.
या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम खात्याने (PWD) तातडीने पुलाची पाहणी करून धोकादायक भागाची दुरुस्ती करावी, तसेच आवश्यक सुरक्षा उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे. पुलाच्या परिसरात योग्य सूचना फलक, सुरक्षा व्यवस्था आणि रात्रीच्या वेळी विजेची सोय निर्माण करण्याची मागणीही करण्यात आली आहे.
नवीन पुलाचे काम वेगाने पूर्ण करण्याची मागणी
दरम्यान, या मार्गावर प्रस्तावित असलेल्या नवीन पुलाचे कामही वेगाने पूर्ण करावे, अशी अपेक्षा स्थानिकांनी व्यक्त केली आहे. जुन्या अरुंद पुलामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असल्याने नवीन पुलाचे काम लवकर मार्गी लागल्यास वाहनचालकांसह स्थानिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.


