मडगाव : नागवाडा-बेताळभाटी येथे घराची देखभाल करण्यासाठी ठेवलेल्या घरगड्याने मालकाच्या विश्वासाचा गैरफायदा घेत घरातील सुमारे सहा लाख रुपयांचे सोन्याचे दागिने आणि रोकड लंपास केल्याचा प्रकार समोर आला. या प्रकरणी कोलवा पोलिसांनी दिलेश्वर पेक्रा (वय ३८, मूळ रा. छत्तीसगड) याच्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला.
याबाबत ६८ वर्षीय घरमालक आयवी मेंडिस (रा. नागवाडा-बेताळभाटी) यांनी कोलवा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, २५ जुलै ते ५ सप्टेंबर या कालावधीत चोरीची ही घटना घडली. आयवी मेंडिस या बहुतांश काळ गोव्याबाहेर वास्तव्यास असतात. त्यामुळे त्यांनी आपल्या घराची साफसफाई, निगा राखणे आणि दैनंदिन कामांची जबाबदारी दिलेश्वर याच्यावर सोपवली होती.
मालकिणीच्या अनुपस्थितीचा आणि विश्वासाचा पूर्ण फायदा घेत संशयिताने घरातील कपाटातून २२ कॅरेट सोन्याची बांगडी, सोन्याची चार कर्णफुले, हिरेजडित सोन्याचा नेकलेस, एक ब्रेसलेट आणि १८ हजार रुपयांची रोकड असा सुमारे सहा लाख रुपयांचा मौल्यवान ऐवज चोरून नेला. मेंडिस गोव्यात घरी परतल्यानंतर कपाटातील दागिने आणि रोकड गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले.
या प्रकरणी कोलवा पोलिसांनी संशयित दिलेश्वर पेक्रा याच्याविरुद्ध चोरीचा गुन्हा नोंदवला असून तो सध्या फरार आहे. संशयिताचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना झाली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मंजू वांतामुरी करत आहेत.


