आगर मालवा : मध्य प्रदेशातील आगर मालवा जिल्ह्यात शनिवारी पहाटे भीषण अपघात झाला. भाविकांना घेऊन जाणारी कार पावसाच्या पाण्याने दुथडी भरून वाहत असलेल्या नाल्यात कोसळल्याने आठ जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये तीन मुले, दोन महिला आणि तीन पुरुषांचा समावेश आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नळखेडा शहराजवळील मां बागलामुखी मंदिर परिसरात हा अपघात घडला. हे ठिकाण जिल्हा मुख्यालयापासून सुमारे ३० किलोमीटर अंतरावर आहे. ओडिशातील भाविक कारमधून प्रवास करत होते. परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे नाल्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. त्याचदरम्यान चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कार नाल्यात कोसळल्याचे सांगण्यात आले.
अपघाताची माहिती मिळताच नळखेडा पोलिसांनी तातडीने बचावकार्य सुरू केले. पोलीस आणि बचाव पथकाने नाल्यातून आठही मृतदेह बाहेर काढले. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले. या घटनेप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. अपघाताच्या नेमक्या कारणाचा तपास सुरू आहे. घटनेबाबत अधिक माहितीची प्रतीक्षा आहे.


