मगोचे कार्यकर्ते सक्रिय झाल्यास अन्य पक्षांना वाव नाही : सुदिन ढवळीकर

मगोप-भाजप युती ही गोवा स्तरावर नसून केंद्रीय नेतृत्वाने ठरवली आहे. योग्य सन्मान मिळाल्यास २०२७ मध्ये २३ हून अधिक आमदार निवडून आणू, असा दावा सुदिन ढवळीकर यांनी केला आहे.

Story: गोवन वार्ता | प्रतिनिधी |
just now
मगोचे कार्यकर्ते सक्रिय झाल्यास अन्य पक्षांना वाव नाही : सुदिन ढवळीकर

पणजी : महाराष्ट्रावादी गोमंतक पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी पक्षाची ताकद आणि भारतीय जनता पक्षासोबतच्या युतीबाबत अत्यंत महत्त्वपूर्ण वक्तव्य केले आहे. पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी मगो पक्षाची राजकीय भूमिका स्पष्ट केली. ढवळीकर यांच्या या विधानामुळे गोव्याच्या राजकीय वर्तुळात भाजप आणि मगोप यांच्यातील सत्ता समीकरणांवर पुन्हा एकदा जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

ढवळीकर यांनी स्पष्ट केले की, भाजप आणि मगोप यांच्यातील युती ही केवळ गोव्यापुरती मर्यादित नसून ती थेट केंद्रीय स्तरावर निश्चित झाली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपचे तत्कालीन राष्ट्रीय अध्यक्ष, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आणि संमतीने हा युतीचा निर्णय झाला होता. त्यामुळे मगो जोपर्यंत सरकारमध्ये सहभागी आहे, तोपर्यंत स्थानिक स्तरावरील कोणतेही नेते किंवा अधिकारी या युतीत अडथळा निर्माण करू शकत नाहीत. 

मगो उमेदवारामुळेच पाळी मतदारसंघात डॉ. सावंत यांचा पराभव झाला होता : ढवळीकर 

मगोची सद्यघडीला राज्यातील विविध मतदारसंघांत उमेदवारांसाठी चाचपणी सुरू असून त्यात साखळी मतदारसंघाचा देखील समावेश आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी, भाजपसोबतच्या युतीमुळेच मगोला राजकीय ताकद आणि सत्ता मिळाली आहे. याच युतीच्या जोरावर मगोपचे तीन आमदार निवडून आले होते, इतर कोणासोबत युती केली असती तर दोन आमदारही निवडून आले नसते, असे विधान केले होते. याबाबत पत्रकारांनी ढवळीकरांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला. 

गोव्यातील मगोपचा जनाधार अद्याप भक्कम असल्याचे सांगताना ढवळीकर म्हणाले की, राज्यातील प्रत्येक मतदारसंघात पक्षाचे किमान तीन हजार निष्ठावंत आणि जागृत मतदार आहेत. सुमारे पन्नास वर्षांपूर्वी मगो पक्षाने केलेले कार्य आणि मांडलेले विचार आजही गोव्याच्या जनतेच्या आणि विशेषतः तरुण पिढीच्या मनात जिवंत आहेत. जेव्हा आजची नवीन पिढी गोव्याचा इतिहास अभ्यासते, तेव्हा त्यांना मगोपचे योगदान स्पष्टपणे समजते. मगोच्या उमेदवारामुळेच यापूर्वी २००८ साली पाळी मतदारसंघात प्रमोद सावंत यांचा पराभव झाला होता, याची आठवणही त्यांनी करून दिली. पक्षाचे कार्यकर्ते पूर्ण क्षमतेने सक्रिय झाले, तर गोव्यात इतर कोणत्याही पक्षाला वाव राहणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

आगामी २०२७ च्या विधानसभा निवडणुकांबाबत बोलताना त्यांनी युतीच्या भवितव्यावर भाष्य केले. भाजपला विधानसभेत २१ किंवा त्यापेक्षा जास्त जागा जिंकून सत्ता स्थापन करायची असेल, तर मगोपची साथ अत्यंत मोलाची ठरेल. मात्र, पक्षाला योग्य सन्मान मिळाला तरच ही युती पुढे कायम राहील, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला. सन्मान मिळाल्यास मगोप आपली ताकद दाखवून देईल आणि २३ पेक्षा जास्त आमदार निवडून आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल.

पक्षाची आणि नेत्यांची पात्रता काढणाऱ्या विरोधकांना ढवळीकर यांनी चोख प्रत्युत्तर दिले. राजकारणात कोणीही कोणाची पात्रता ठरवू शकत नाही. प्रत्येक नेता आणि पक्ष आपापल्या जागी महत्त्वाचा असतो आणि गोव्यातील जनतेने प्रत्येकाला त्यांची योग्य जागा दाखवून दिली आहे, असे सांगत त्यांनी टीकाकारांचा समाचार घेतला.




हेही वाचा
सर्व पहा