डीजे सिस्टम हटविल्याने वास्कोत काही काळ तणाव

गणेशमूर्ती विसर्जनावेळी प्रकार : पोलिसांकडून सावधगिरी

Story: गोवन वार्ता। प्रतिनिधी |
19th September, 11:29 pm
डीजे सिस्टम हटविल्याने वास्कोत काही काळ तणाव

वास्को : गणपती मूर्ती विसर्जन मिरवणुकीत डीजे सिस्टमचा वापर करण्यास बंदी असल्याची पूर्वसूचना दिलेली असतानाही डिजे सिस्टमचा पुरेपूर वापर करण्याच्या तयारीत असलेल्या एका मंडळाची डीजे सिस्टम वास्को पोलिसांनी हटविली. त्यामुळे तेथे काही काळ तणाव निर्माण झाला. मात्र, पोलीस उपअधीक्षक गुरुदास कदम यांनी घेतलेल्या कडक पावित्र्यामुळे परिस्थिती पूर्ववत झाली.

गणपती मूर्ती विसर्जन मिरवणुकीत डीजे सिस्टम किंवा मोठ्या आवाजात ध्वनीक्षेपकांचा वापर करू नये, असे आवाहन सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसमवेत घेतलेल्या बैठकांमध्ये स्थानिक प्रशासनाने केले होते. मंडळांमध्ये यासंबंधी जागृती करण्यात आली होती. तथापी, दीड दिवसांच्या गणपती विसर्जन मिरवुणकीत या नियमांचे उल्लंघन करण्यात आले होते. याप्रकरणी नागरिकांनी नाराजी व्यक्त केली होती. तसेच नियमांचे काय झाले? असा प्रश्न पोलिसांना विचारला होता. त्यामुळे पाच दिवसांच्या गणपती मूर्ती विसर्जन मिरवणुकीत डिजे सिस्टमचा वापर होऊ नये यासाठी पोलिसांनी सावधगिरी बाळगली तसेच संबंधित मंडळाच्या प्रतिनिधींना आवाहन केले होते. परंतु, या आवाहनाकडे दुर्लक्ष करून येथील एका मंडळाने डिजे सिस्टम असलेला ट्रक उभा केला होता. या डीजे सिस्टमचा वापर मिरवणुकीत करण्याच्या तयारी चालली होती. याप्रकरणी वास्को पोलिसांना माहिती मिळताच उपअधीक्षक गुरुदास कदम यांच्यासह निरीक्षक, उपनिरीक्षक व इतर पोलीस त्या ठिकाणी पोहोचले. त्यांनी त्या मंडळाच्या प्रतिनिधींना सदर डीजे सिस्टमचा वापर मिरवणुकीत करता येणार नसल्याचे सांगितले. आम्ही या डीजे सिस्टमसाठी आगाऊ रक्कम दिल्याचे सांगून परवानागी देण्याची मागणी केली. मात्र, त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्या प्रतिनिधींना बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयाची माहिती देण्यात आली. पोलिसांच्या या कारवाईमुळे तेथे काही काळ तणाव निर्माण झाला होता.

गुरुदास कदम यांनी मंडळांनी डीजे सिस्टम व मोठ्या आवाजातील संगीताचा वापर मिरवणुकीत करू नये असे सांगितले. मंडळांनी दिंडी किंवा नियमानुसार जे ध्वनीक्षेपक वापरता येतील ते वापरून मिरवणुका काढाव्यात, असे आवाहन केले.

पोलिसांचे सहकार्य करण्याचे आवाहन

दीड दिवसांच्या विसर्जन मिरवणुकीप्रसंगी आमच्याकडे पोलीस फौजफाटा कमी होता. त्याचा गैरफायदा घेऊन एक- दोन मंडळांनी डिजे सिस्टमचा वापर केला. आता नियमांचे उल्लंघन होऊ नये यासाठी पोलीस तैनात करण्यात आले आहेत. मंडळांनी डिजे सिस्टमचा वापर करू नये. पोलिसांना योग्य सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.