म्हापसा : पर्वरी येथील निओ मॅजेस्टिक कॅसिनोचे संचालक श्रीनिवास नायक यांच्यावरील गोळीबार प्रकरणातील मुख्य शूटर संशयित आरोपी अर्पुथराज पुलराज नदार उर्फ अण्णा (४९, रा. मुंबई व मूळ तामिळनाडू) याला म्हापसा प्रथम वर्ग न्यायालयाने अतिरिक्त चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तर, या प्रकरणातील मुख्य सूत्रधार अजूनही पोलिसांच्या तावडीत सापडलेला नाही.
चेन्नईतील लाईट हाऊस पोलिसांच्या सहाय्याने आरोपी अण्णा नदार याला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पकडून अटक केली होती. गोव्यात दि. १५ सप्टेंबर रोजी ट्रांझिट रिमांडवर आणल्यानंतर आरोपीला म्हापसा प्रथमवर्ग न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. ही कोठडी संपल्यामुळे गुन्हे शाखेने संशयिताला शनिवार, १९ रोजी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने ही कोठडी अजून चार दिवसांनी वाढवण्याचा आदेश दिला.
तर, या गुन्ह्यातील दोन्ही मुख्य शूटर्सना सहकार्य केलेले संशयित आरोपी काझू अलाउद्दीन शेख (२८, रा. मुंबई), सूरज उपेंद्र आचार्य (३६, रा. बोरीवली, मुंबई) व पवन हरी सिंग सौर (१९, रा. मुंबई व मूळ मध्यप्रदेश) यांची १४ दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.
दरम्यान, २८ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री ८.४७ वाजता हा हल्ला घडला होता. पर्वरी येथील हॉटेल निओ मॅजेस्टिकचे संचालक श्रीनिवास नायक आपल्या निवासस्थानी जाण्यासाठी बाहेर पडत असताना, दबा धरून बसलेल्या दोघा हल्लेखोरांनी त्यांच्यावर तीन राऊंड गोळीबार केला. नायक यांच्या अंगरक्षकांनी प्रतिकारात्मक तीन राऊंड फायर केल्यानंतर ते घटनास्थळावरून फरार झाले होते.
सुदैवाने श्रीनिवास नायक या हल्ल्यातून बालंबाल बचावले. घटनेनंतर पर्वरी पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम १०९(१), १२५, ३(५) आणि शस्त्रास्त्र कायद्याच्या कलम ३ व २७ अन्वये गुन्हा नोंदवला होता. प्रकरणाचे गांभीर्य ओळखून राज्य सरकारने तपास गुन्हा शाखेकडे वर्ग केला होता.
कारचालक, दुसरा शूटर पोलीस कोठडीत
श्रीनिवास नायक यांच्यावरील खुनी हल्ल्यातील मध्यस्थ सतीश शिंदे (४८, रा. मुंबई), दुसरा शूटर बाबू उर्फ इसार अली (३५, रा. बहराइच उत्तर प्रदेश) आणि कार चालक सरार अली अहमद (२५, रा. उत्तर प्रदेश) हे सध्या पोलीस कोठडीत आहेत.


