गोवन वार्ता प्रतिनिधी
पणजी
काँग्रेसचे गोवा प्रभारी माणिकराव ठाकरे आणि पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांच्यात पक्षाच्या बैठकींतील उपस्थितीवरून मतभेद समोर आले आहेत. पाटकर बैठकींना उपस्थित राहून आपले मत मांडत नसल्याचे ठाकरे यांनी सांगितले. तर, संबंधित बैठकींची माहिती किंवा निमंत्रण मिळत नसल्याचे पाटकर यांनी स्पष्ट केले.
शुक्रवारी काँग्रेसच्या कोअर कमिटीची बैठक झाली. या बैठकीला पाटकर अनुपस्थित होते. त्याबाबत ठाकरे यांनी सांगितले की, माजी प्रदेशाध्यक्ष हे राज्य पातळीवरील नेते असल्याने पाटकर यांचा पक्षाच्या विविध समित्यांमध्ये समावेश करण्यात आला आहे. त्यांना बैठकींना आमंत्रित केले जाते. त्यांनी बैठकीला उपस्थित राहून आपले मत आणि सल्ला मांडावा, अशी पक्षाची अपेक्षा आहे. पाटकर हे विजय सरदेसाई यांच्यासोबत दिसत असले तरी ते काँग्रेसमध्येच आहेत, असेही ठाकरे यांनी स्पष्ट केले.
बैठकीची माहिती मिळाली नसल्याचे पाटकरांचे स्पष्टीकरण
ठाकरे यांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना अमित पाटकर म्हणाले, कोअर कमिटीच्या बैठकीची आपल्याला माहिती नव्हती. बैठकीचे निमंत्रण कोणत्या क्रमांकावरून पाठवण्यात आले, हे स्पष्ट करावे. व्हॉट्सअॅपवर संपर्काबाबत काही अडचणी निर्माण झाल्यानंतर नंतर संदेश पाठवून निमंत्रण दिल्याचे दाखवले जाते. पक्षाचे प्रभारी म्हणून ठाकरे यांनी संबंधित माहिती घेऊन भूमिका मांडावी.
पक्षश्रेष्ठींच्या संपर्कात : पाटकर
पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाशी माझी चर्चा झाली आहे. काँग्रेसच्या अधिकृत व्यासपीठाच्या वापराबाबत काही बाबी वरिष्ठांच्या निदर्शनास आणून दिल्या आहेत, असेही पाटकर यांनी सांगितले. शुक्रवारी झालेल्या कोअर कमिटीच्या बैठकीत समितीशी संबंधित नसलेल्या काही व्यक्ती उपस्थित होत्या, तर काही सदस्य अनुपस्थित होते. या संदर्भात अधिकृत माहिती स्पष्ट होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सूचित केले.


