भाजपविरोधकांनी एकत्र यावे; काँग्रेसची दारे खुली

भाजपविरोधात लढणाऱ्या सर्व पक्षांनी एकत्र यावे, अशी गोमंतकीय जनतेची भूमिका असून काँग्रेसचीही तीच भूमिका आहे. त्यामुळे गोवा फॉरवर्ड, आम आदमी पक्ष, आरजी, तसेच विजय सरदेसाई यांच्यासह भाजपविरोधी शक्तींना एकत्र आणण्यासाठी काँग्रेसने युतीची दारे खुली ठेवली आहेत. जोपर्यंत जनतेची मागणी असेल, तोपर्यंत यासाठी प्रयत्न सुरूच राहतील, असे गोवा काँग्रेसचे प्रभारी माणिकराव ठाकरे यांनी सांगितले.


19th September, 11:52 pm
भाजपविरोधकांनी एकत्र यावे; काँग्रेसची दारे खुली

गोवन वार्ता प्रतिनिधी
पणजी : भाजपविरोधात लढणाऱ्या सर्व पक्षांनी एकत्र यावे, अशी गोमंतकीय जनतेची भूमिका असून काँग्रेसचीही तीच भूमिका आहे. त्यामुळे गोवा फॉरवर्ड, आम आदमी पक्ष, आरजी, तसेच विजय सरदेसाई यांच्यासह भाजपविरोधी शक्तींना एकत्र आणण्यासाठी काँग्रेसने युतीची दारे खुली ठेवली आहेत. जोपर्यंत जनतेची मागणी असेल, तोपर्यंत यासाठी प्रयत्न सुरूच राहतील, असे गोवा काँग्रेसचे प्रभारी माणिकराव ठाकरे यांनी सांगितले.
शुक्रवारी काँग्रेस भवनात झालेल्या कोअर कमिटीच्या बैठकीनंतर ठाकरे पत्रकारांशी बोलत होते. यावेळी प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, आमदार कार्लुस फेरेरा व इतर उपस्थित होते. गोवा फॉरवर्ड आणि आम आदमी पक्षाच्या युतीबाबत ठाकरे म्हणाले की, विरोधकांनी एकत्र येऊन निवडणूक लढवावी, अशी जनतेची इच्छा आहे. त्यानुसार काँग्रेसने युतीसाठी पुढाकार घेतला आहे. भाजपविरोधात काम करणाऱ्या विविध पक्षांना एकत्र आणण्यासाठी यापूर्वीही प्रयत्न करण्यात आले आहेत. काँग्रेसने युतीसाठी आपली दारे बंद केली नसून संबंधित पक्षांनीही जनतेची भूमिका लक्षात घेऊन निर्णय घ्यावा.
२२ सप्टेंबर रोजी होणाऱ्या ‘गोवा राखण यात्रे’बाबत कोअर कमिटीच्या बैठकीत चर्चा झाली. यात्रा अधिक प्रभावीपणे पुढे नेण्याबरोबरच त्यातील उणिवा दूर करण्याबाबतही विचारविनिमय करण्यात आला. ही यात्रा यशस्वी होईल, असा विश्वास ठाकरे यांनी व्यक्त केला.


बोरकरांच्या मागणीला विधानसभेत पाठिंबा
आजीपीचे आमदार वीरेश बोरकर यांच्या मागणीला काँग्रेसने विधानसभेत पाठिंबा दिला आहे. राज्याच्या हिताचे मुद्दे काँग्रेसच्या कॉमन मिनिमम प्रोग्रॅममध्ये समाविष्ट केले जातील, असे विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी सांगितले. बोरकर यांच्या ‘पोगो’ विधेयकासंदर्भातील मागणीवर प्रतिक्रिया देताना आलेमाव यांनी ही भूमिका स्पष्ट केली.