कोट्यवधींचा खर्च करूनही वाळपई पालिका मैदानाची दुरवस्था

वाळपई पालिकेच्या मैदानाची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. मैदानावर गवत वाढल्याने खेळाडूंना खेळण्यासाठी अडचण निर्माण झाली आहे. कोट्यवधी रुपये खर्च करून मैदानाचा विकास करण्यात आला; मात्र त्याची नियमित देखभाल होत नाही. मैदानावर मोठ्या प्रमाणात वाढलेले गवत, अस्वच्छता आणि देखभालीचा अभाव यामुळे खेळाडू व नागरिकांमध्ये नाराजी आहे.


19th September, 11:50 pm
कोट्यवधींचा खर्च करूनही वाळपई पालिका मैदानाची दुरवस्था

गवताने व्यापलेेले वाळपई नगरपालिका मैदान.
गोवन वार्ता प्रतिनिधी
वाळपई
वाळपई पालिकेच्या मैदानाची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. मैदानावर गवत वाढल्याने खेळाडूंना खेळण्यासाठी अडचण निर्माण झाली आहे. कोट्यवधी रुपये खर्च करून मैदानाचा विकास करण्यात आला; मात्र त्याची नियमित देखभाल होत नाही. मैदानावर मोठ्या प्रमाणात वाढलेले गवत, अस्वच्छता आणि देखभालीचा अभाव यामुळे खेळाडू व नागरिकांमध्ये नाराजी आहे.
वाळपई पालिकेच्या हद्दीत असलेले हे मुख्य मैदान आहे. मात्र, मैदानाची दुरवस्था झाल्याने खेळाडूंना सरावासाठी सालेली-सत्तरी येथील खासगी मैदानाचा आधार घ्यावा लागत आहे. तेथे खेळाडूंना पैसे मोजावे लागत असल्याने आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. पालिका मैदानाच्या विकासासाठी सुमारे तीन कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. खेळाडूंना दर्जेदार मैदान उपलब्ध व्हावे आणि विविध क्रीडा स्पर्धा आयोजित करता याव्यात, हा यामागील उद्देश होता. मैदानाभोवती सुरक्षाकुंपण, पायाभूत सुविधा आणि मैदानात सुधारणा करण्यात आली होती. मोठ्या निधीतून मैदानाचा कायापालट झाल्यानंतर खेळाडूंना चांगली सुविधा मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र प्रत्यक्षात पावसाळा सुरू झाल्यानंतर मैदानावर गवत वाढले. मैदानाची नियमित साफसफाईकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे.
नोव्हेंबर २०२४ मध्ये मैदानाच्या देखभालीसाठी सुमारे १४.६४ लाख रुपयांचा खर्च करण्यात आला होता. त्यानंतर आता २०२६ मध्ये मैदानाच्या दुरुस्तीसाठी सुमारे २६.३० लाख रुपयांची नवी निविदा तयार आहे. यापूर्वी देखभालीवर खर्च केल्यानंतर पुन्हा त्याच कारणासाठी मोठा निधी का खर्च करावा लागत आहे, असा प्रश्न विचारला जात आहे. मैदानाच्या विविध कामांवर करण्यात आलेल्या खर्चाच्या उपलब्ध माहितीत नवीन पालिका मैदानासाठी सुमारे तीन कोटी रुपये, हाय-मास्ट प्रकाशयोजनेसाठी ९७.६७ लाख रुपये, देखभालीसाठी १४.६४ लाख रुपये आणि २०२६ मधील मैदान दुरुस्तीसाठी सुमारे २६.३० लाख रुपयांची निविदा यांचा समावेश आहे.
मैदानाची देखभाल होणे आवश्यक
मैदानाची निर्मिती किंवा सुधारणा करणे महत्त्वाचे आहे, तितकेच देखभाल करणेही आवश्यक आहे. मैदानावर नियमित गवत कापणी, साफसफाई, पावसाळ्यातील पाण्याचा निचरा, मैदानाची पृष्ठभागाची निगा, कुंपणाची दुरुस्ती आणि इतर मूलभूत कामे वेळेवर होणे गरजेचे आहे. दरवर्षी देखभालीसाठी निधी उपलब्ध करून देऊनही मैदान काही महिन्यांतच पुन्हा गवताने व्यापले जात असेल, तर देखभाल व्यवस्थेचे नियोजन आणि त्याची अंमलबजावणी तपासण्याची गरज आहे.