शेफालीचे वादळी शतक; टीम इंडियाची अंतिम फेरीत धडक

आशियाई क्रीडा स्पर्धा : बांगलादेशवर ११४ धावांनी मात, भारत सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरीत

Story: गोवन वार्ता। न्यूज डेस्क |
20th September, 11:47 pm
शेफालीचे वादळी शतक; टीम इंडियाची अंतिम फेरीत धडक

निशिन : गतविजेत्या भारतीय महिला क्रिकेट संघाने आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६च्या अंतिम फेरीत सलग दुसऱ्यांदा प्रवेश केला. उपांत्य फेरीत भारताने बांगलादेशचा ११४ धावांनी पराभव करत किमान रौप्यपदक निश्चित केले. शेफाली वर्माच्या नाबाद शतकाच्या जोरावर भारताने २० षटकांत ४ बाद १९५ धावा केल्या. प्रत्युत्तरात बांगलादेशचा डाव १५.४ षटकांत ८१ धावांत आटोपला.
शेफालीचे तुफानी शतक
प्रथम फलंदाजी करताना शेफालीने ४९ चेंडूंत नाबाद १०० धावा केल्या. तिच्या खेळीत ९ षटकार आणि ३ चौकारांचा समावेश होता. हे तिचे टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिले शतक ठरले. स्मृती मानधनाने ३७ धावा करत शेफालीला सुरुवातीला साथ दिली. दोघींनी पहिल्या विकेटसाठी ७२ धावांची भागीदारी केली.
हरमनप्रीतसोबत ९४ धावांची भागीदारी
गुनालन कमालिनी ३ धावांवर बाद झाल्यानंतर कर्णधार हरमनप्रीत कौरने शेफालीला साथ दिली. दोघींनी तिसऱ्या विकेटसाठी ५५ चेंडूंत ९४ धावांची भागीदारी केली. हरमनप्रीतने ३३ चेंडूंत ४० धावा केल्या. अखेरच्या षटकात शेफालीने शतक पूर्ण करत भारताला १९५ धावांपर्यंत पोहोचवले.
बांगलादेश ८१ धावांत गारद
१९६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशला भारतीय गोलंदाजांसमोर फार काळ टिकता आले नाही. दिलारा अख्तरने सर्वाधिक २७ धावा केल्या. भारताकडून दीप्ती शर्मा आणि नंदनी शर्मा यांनी प्रत्येकी तीन, तर श्री चरणीने दोन बळी घेतले. बांगलादेशचा डाव ८१ धावांत संपला आणि भारताने ११४ धावांनी विजय मिळवला.
या विजयासह भारताने अंतिम फेरीतील स्थान निश्चित करत किमान रौप्यपदक पक्के केले. बांगलादेशविरुद्ध धावांच्या फरकाने हा भारताचा दुसरा मोठा विजय ठरला.

एका डावात ९ षटकार; विक्रमाची बरोबरी
बांगलादेशविरुद्ध ९ षटकार ठोकत शेफाली वर्माने महिला टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्याच्या एका डावात सर्वाधिक षटकार मारण्याच्या विक्रमाचीही बरोबरी केली. वेस्ट इंडिजच्या डीआंद्रा डॉटिन आणि हेली मॅथ्यूज यांनी यापूर्वी प्रत्येकी ९ षटकार मारले आहेत.    

अंतिम फेरीत श्रीलंकेशी सामना
भारताचा आता मंगळवारी सुवर्णपदकासाठी श्रीलंकेशी सामना होणार आहे. मागील आशियाई क्रीडा स्पर्धेतही महिला क्रिकेटचा अंतिम सामना भारत आणि श्रीलंका यांच्यातच झाला होता. अलीकडे झालेल्या महिला टी-२० आशिया चषकाच्या अंतिम सामन्यातही दोन्ही संघ आमनेसामने आले होते. त्या सामन्यात भारताने श्रीलंकेचा ७२ धावांनी पराभव करत विजेतेपद पटकावले होते.