आशियाई क्रीडा स्पर्धा : हॉकीत भारताचा गोलधडाका

दोन्ही संघांची विजयी सलामी; इंडोनेशिया, उझबेकिस्तानचा धुव्वा; पुरुषांकडून १३, तर महिलांकडून १९ गोल

Story: गोवन वार्ता। न्यूज डेस्क |
20th September, 11:42 pm
आशियाई क्रीडा स्पर्धा : हॉकीत भारताचा गोलधडाका

नागोया : आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६मध्ये भारतीय हॉकीने रविवारी गोलांचा अक्षरशः पाऊस पाडत शानदार सुरुवात केली. भारतीय पुरुष संघाने पूल ‘अ’मधील पहिल्या सामन्यात इंडोनेशियाचा १३-१ असा पराभव केला, तर महिला संघाने पूल ‘ब’मध्ये उझबेकिस्तानचा तब्बल १९-० असा धुव्वा उडवला. दोन्ही सामन्यांत भारतीय संघांनी सुरुवातीपासून अखेरपर्यंत वर्चस्व राखले.
भारताने सामन्याच्या सहाव्याच मिनिटाला खाते उघडले. त्यानंतर अभिषेक आणि दिलप्रीतच्या गोलांनी आघाडी वाढवली. राजिंदरने रिबाउंडवर गोल केला, तर हरमनप्रीतने पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रूपांतर केले.
पुरुष संघाचा १३-१ असा दणदणीत विजय
सामन्यात सुरुवातीपासूनच पुरुष संघाने वर्चस्व गाजवले. स्ट्रायकर दिलप्रीत सिंहच्या चार गोलांच्या जोरावर भारताने इंडोनेशियाविरुद्ध एकतर्फी विजय मिळवला. शिलानंद लाकडाने सहाव्या आणि ३५व्या मिनिटाला, तर सुखजीत सिंहने ३८व्या आणि ४८व्या मिनिटाला गोल केले. अभिषेकने १२व्या, राजिंदर सिंहने १९व्या, मनदीप सिंहने २१व्या, कर्णधार हरमनप्रीत सिंहने २८व्या आणि जुगराज सिंहने ४७व्या मिनिटाला गोल केला. इंडोनेशियाकडून अर्धने ३३व्या मिनिटाला एकमेव गोल केला.
मध्यंतराला भारत ७-० असा आघाडीवर होता.
तिसऱ्या क्वार्टरमध्ये इंडोनेशियाने एक गोल केला; मात्र भारताने त्यानंतर आणखी गोल करत सामना पूर्णपणे आपल्या ताब्यात ठेवला. दिलप्रीतने हॅट्ट्रिक पूर्ण केली आणि अखेर चौथा गोल करत भारताचा विजय १३-१ असा निश्चित केला.


महिलांचा उझबेकिस्तानवर १९-० असा विजय
महिला संघाने तर त्याहूनही आक्रमक कामगिरी करत उझबेकिस्तानचा १९-० असा पराभव केला. दोन्ही संघांमधील हा पहिलाच आंतरराष्ट्रीय सामना होता. भारताने सुरुवातीपासून आक्रमक खेळ करत उझबेकिस्तानच्या बचावफळीवर सातत्याने दबाव ठेवला.

दीपिकाचा आठ गोलांचा धडाका
भारताच्या विजयाची प्रमुख शिल्पकार दीपिका कुमारी ठरली. तिने तब्बल आठ गोल करत उझबेकिस्तानच्या बचावफळीला अक्षरशः जेरीस आणले. दीपिकाने सहा गोल पेनल्टी कॉर्नरवरून, तर दोन गोल मैदानी खेळातून केले.
सविता पुनियाचा भक्कम बचाव
भारतीय गोलरक्षक सविता पुनियानेही प्रभावी कामगिरी केली. उझबेकिस्तानला सामन्यात गोल करण्याची मोजकीच संधी मिळाली. दुसऱ्या क्वार्टरच्या अखेरीस शाहजोदा जरीपोवाने मारलेला फटका सविताने अडवत प्रतिस्पर्धी संघाला खाते उघडू दिले नाही.
दोन्ही संघांची पुढील लढत
या विजयामुळे पुरुष संघाने पूल ‘अ’मध्ये, तर महिला संघाने पूल ‘ब’मध्ये आपल्या मोहिमेला दमदार सुरुवात केली आहे. पुरुष संघाचा पुढील सामना मंगळवारी श्रीलंकेविरुद्ध होणार आहे. महिला संघाचा पुढील सामना २१ सप्टेंबरला इंडोनेशियाविरुद्ध गिफू प्रिफेक्चरल ग्रीन स्टेडियमवर होणार आहे.
दोन्ही भारतीय संघांनी पहिल्याच सामन्यात केलेल्या गोलवर्षावामुळे आशियाई क्रीडा स्पर्धेतील हॉकीमध्ये भारताच्या मोहिमेची जोरदार सुरुवात झाली आहे.
दिलप्रीतचे चार गोल
- दिलप्रीतने सामन्यात १८व्या, १९व्या, ३७व्या आणि ४९व्या मिनिटाला गोल केले. विशेष म्हणजे त्याचे चारही गोल फील्ड गोल होते. शिलानंद लाकडाने सहाव्या आणि ३५व्या मिनिटाला दोन गोल केले. सुखजीत सिंहने ३८व्या आणि ४८व्या मिनिटाला गोल नोंदवले.
- अभिषेकने १२व्या, राजिंदर सिंहने १९व्या, मनदीप सिंहने २१व्या, कर्णधार हरमनप्रीत सिंहने २८व्या आणि जुगराज सिंहने ४७व्या मिनिटाला गोल केला. इंडोनेशियाकडून अर्धने ३३व्या मिनिटाला एकमेव गोल केला.
इशिकाने नोंदवली हॅट्ट्रिक
दीपिकासोबत इशिकानेही आक्रमणात प्रभावी कामगिरी करत तीन गोल केले. नवनीत कौर आणि लालथंतलुआंगी यांनी प्रत्येकी दोन गोल केले. लालरेमसियामी, बालजीत कौर, नेहा आणि साक्षी राणा यांनी प्रत्येकी एक गोल करत भारताच्या १९ गोलांच्या विजयात योगदान दिले.
पूल ‘ब’मध्ये भारताचे अव्वल स्थान
१९-० या मोठ्या विजयामुळे भारताने पूल ‘ब’मध्ये तीन गुणांसह +१९ गोलफरक नोंदवला. महिलांचा पुढील सामना २१ सप्टेंबर रोजी इंडोनेशियाविरुद्ध होणार आहे. पुरुष संघाचाही पुढील सामना श्रीलंकेविरुद्ध होणार असून, सलामीच्या सामन्यातील मोठ्या विजयामुळे भारतीय संघांचा आत्मविश्वास उंचावला आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेच्या सुरुवातीलाच पुरुष आणि महिला संघांनी मिळून प्रतिस्पर्ध्यांच्या गोलजाळ्यात तब्बल ३२ वेळा चेंडू पाठवत भारतीय हॉकीची ताकद दाखवून दिली आहे.