गोव्यासह मुंबईतून ड्रग्ज तस्करी करणाऱ्यास हैदराबादमधून अटक

तेलंगणाच्या ईगल भरारी पथकाने मियापूर येथे १४ एमडीएमए गोळ्यांसह तस्कराला अटक केली. तपासात गोव्यातील 'बाबा' नावाच्या व्यक्तीकडून ड्रग्ज मिळवून सदर तस्कर मुंबईमार्गे हैदराबादला पुरवठा करत असल्याचे उघडकीस आले आहे.

Story: गोवन वार्ता | प्रतिनिधी |
just now
गोव्यासह मुंबईतून ड्रग्ज तस्करी करणाऱ्यास हैदराबादमधून अटक

पणजी : हैदराबाद-तेलंगणा येथील अँटी-नारकोटिक्स युनिट 'ईगल' (EAGLE) दलाने मियापूर पोलिसांच्या सहकार्याने मियापूर मेट्रो स्टेशन परिसरात धडक कारवाई करत एका आंतरराज्य ड्रग्ज तस्कराला रंगेहाथ अटक केली आहे. पोलारेड्डी सुरेश गोपी (वय २९, मूळ रा. मिर्यालगुडा, नलगोंडा, सध्या रा. एलबी नगर, हैदराबाद) असे या संशयिताचे नाव असून, त्याच्याकडून सुमारे ९ ग्रॅम वजनाच्या १४ एमडीएमए गोळ्या आणि दोन मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत. या अटकेनंतर तपासात गोवा, मुंबई आणि हैदराबाद असा विस्तारलेला आंतरराज्य अमली पदार्थ पुरवठा साखळीचा एक मोठा सुगावा पोलिसांच्या हाती लागला आहे.

आधी गोव्यातील 'बाबा',नंतर मुंबईच्या 'दानिश'कडून घेतले अमलीपदार्थ : तस्कर गोपीची माहिती 

या गुन्ह्यातील संशयिताचा गोव्याशी असलेला संबंध समोर आला आहे. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, संशयित सुरेश गोपी हा जुलै २०२४ मध्ये गोव्यात वास्तव्यास होता. तेथे तो भाड्याच्या मालमत्तांच्या (पेइंग गेस्ट/रेंटल प्रॉपर्टी) व्यवसायात कार्यरत होता. गोव्यात असतानाच तो अमली पदार्थांच्या खरेदी-विक्रीत सक्रिय असलेल्या स्थानिक आणि आंतरराज्य नेटवर्कच्या संपर्कात आला. या काळात त्याची ओळख 'बाबा' नावाच्या एका स्थानिक ड्रग्ज पुरवठादाराशी झाली. गोव्यातील या 'बाबा'कडून रोख रकमेच्या व्यवहारांवर ड्रग्ज खरेदी करण्यास त्याने सुरुवात केली. स्वतःच्या ओळखीच्या लोकांत जास्त दराने अमली पदार्थ पुरवून नफा कमवण्याची सवय त्याला लागली. गोव्यातील वास्तव्यादरम्यान त्याचा परिचय मुंबईतील दानिश आलम अन्सारी याच्याशीही झाला, जो गोव्यात येऊन अमली पदार्थांची विक्री करत असे.

या आंतरराज्य तस्करीच्या नेटवर्कचा पुढील उलगडा करताना पोलिसांनी सांगितले की, हैदराबादमधील दोन जुन्या परिचित व्यक्तींनी संशयिताकडे एमडीएमए गोळ्यांची मागणी केली होती. त्यानुसार संशयिताने १६ सप्टेंबर रोजी मुंबई गाठले. तेथे  दानिश अन्सारी याच्याकडून बँक ट्रान्सफरद्वारे २२,५०० रुपये पाठवून प्रति गोळी ७५० रुपये दराने एकूण २९ एमडीएमए गोळ्या खरेदी केल्या. मुंबईत असतानाच त्याने मूळ गोमंतकीय मुन्ना या व्यक्तीला १५ गोळ्या विकल्या आणि उर्वरित १४ गोळ्या घेऊन तो नेरुळ (मुंबई) येथून खाजगी बसने हैदराबादला रवाना झाला.

हैदराबाद गाठल्यानंतर मियापूर मेट्रो स्टेशनजवळ या गोळ्यांची डिलिव्हरी देण्यासाठी जात असतानाच पूर्व माहितीच्या आधारे ईगल दलाने त्याला गस्त घालून रोखले आणि अटक केली. याप्रकरणी मियापूर पोलीस ठाण्यात एनडीपीएस (NDPS) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या गोव्यातील 'बाबा', 'मुन्ना' आणि मुंबईतील दानिश अन्सारी हे मुख्य संशयित फरार असून, पोलीस त्यांच्या शोधासाठी पथके रवाना करत आहेत. तसेच जप्त केलेल्या मोबाईलच्या डेटावरून या नेटवर्कमधील इतर ग्राहक आणि आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी केली जात आहे.


हेही वाचा
सर्व पहा