मडगाव : आगामी गोवा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय घडामोडींना मोठा वेग आला असून विविध पक्षांच्या हालचाली तीव्र झाल्या आहेत. या राजकीय वातावरणात गोवा फॉरवर्ड पक्षाने आपली अधिकृत भूमिका स्पष्ट केली आहे. 'गोवा फर्स्ट' हे पक्षाचे मूळ धोरण कायम ठेवत राज्यातील जनतेला एकजूट, विश्वासार्ह आणि धर्मनिरपेक्ष पर्याय देण्यासाठी सर्व समविचारी शक्तींना एकत्र आणण्यास पक्ष पूर्णपणे कटिबद्ध असल्याचे गोवा फॉरवर्डने समाजमाध्यमांद्वारे अधिकृतपणे जाहीर केले आहे.
गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस आणि गोवा फॉरवर्ड पक्षाचे संभाव्य विलीनीकरण किंवा युती होणार असल्याच्या जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. या पार्श्वभूमीवर पक्षाने समाजमाध्यमांवर पोस्ट शेअर करत आपली भूमिका मांडली. गोव्याला एक विश्वासार्ह, सर्वसमावेशक आणि लोककेंद्री राजकीय पर्याय देणे हेच पक्षाचे मुख्य उद्दिष्ट आहे. त्यासाठी सर्व समविचारी धर्मनिरपेक्ष पक्षांना एका व्यासपीठावर आणणे ही काळाची गरज असल्याचे पक्षाने अधोरेखित केले आहे.
गोव्याच्या व्यापक आणि शाश्वत हितासाठी सर्व समविचारी शक्तींनी एकत्र येणे ही केवळ पक्षाची राजकीय प्राथमिकता नसून ती एक महत्त्वाची सामाजिक जबाबदारी आहे, असेही पक्षाने स्पष्ट केले. त्यामुळे येणाऱ्या काळात राज्यातील धर्मनिरपेक्ष आघाडी बळकट करण्याच्या दृष्टीने पक्ष सक्रिय पावले उचलेल, असे स्पष्ट संकेत या निवेदनाद्वारे मिळाले आहेत.
दरम्यान, पक्षाने सध्या बाजारात पसरत असलेल्या विविध राजकीय चर्चा आणि अफवांवर सावधगिरीचा इशारा दिला आहे. पक्षाकडून अधिकृतपणे कोणतीही माहिती किंवा निवेदन जाहीर केले जात नाही, तोपर्यंत राजकीय वर्तुळातील अफवांवर आणि चर्चांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन कार्यकर्त्यांना व नागरिकांना करण्यात आले आहे. पक्षाची अधिकृत भूमिका ही केवळ पक्षाच्या अधिकृत सूत्रांकडूनच स्पष्ट केली जाईल, असे सांगत पक्षाने इतर सर्व चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला आहे.


