सिंधुदुर्ग : कणकवली आगाराची कणकवली-मौदे ही एसटी बस अरुणा धरणाजवळ भोम गवळवाडी हद्दीत सुमारे २०० फूट खोल दरीत कोसळून भीषण अपघात झाला. शुक्रवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र चालक आणि वाहकासह बसमधील १२ प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. बस दरीत कोसळत असताना एका झाडाला धडकून तिथेच अडकल्यामुळे धरणाच्या पाण्यात जाण्यापासून वाचली आणि मोठा अनर्थ टळला.
या अपघातानंतर परिसरात मोबाईल नेटवर्क नसल्याने तातडीने मदतीसाठी कोणाशीही संपर्क साधणे शक्य नव्हते. रात्रीचा किर्र अंधार आणि दाट झाडीतून प्रवाशांनी एकमेकांना सावरत जिवाच्या आकांताने दरीतून वर रस्त्यावर येण्याचा मार्ग काढला. त्याच वेळी रस्त्यावरून जाणाऱ्या एका खासगी वाहनाला थांबवून प्रवासी मौदे गावातील आपल्या घरी पोहोचले. या घटनेची माहिती खासगी वाहनचालक आनंद जामदार यांनी जिल्हा परिषद सदस्य प्रमोद रावराणे यांना दिली, ज्यांनंतर वैभववाडी पोलीस आणि एसटी प्रशासनाला तात्काळ सूचित करण्यात आले.
माहिती मिळताच पोलीस निरीक्षक मनोज सोनवलकर आणि सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मौदे गावात जाऊन जखमी प्रवाशांची विचारपूस केली आणि स्थानिक डॉक्टरांच्या मदतीने त्यांच्यावर प्राथमिक उपचार केले. जखमी चालक युवराज पाटील आणि वाहकाला वैभववाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर एसटीचे विभाग नियंत्रक घोडे यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली.
दरम्यान, या अपघाताला चालक युवराज पाटील याने मद्यप्राशन करून गाडी चालवणे कारणीभूत असल्याचा गंभीर आरोप काही प्रवाशांनी केला आहे. या आरोपांची दखल घेत वैभववाडी पोलिसांनी ग्रामीण रुग्णालयाला अधिकृत पत्र देऊन चालकाची वैद्यकीय चाचणी करण्याची मागणी करण्यात आली. याच वळणावर गेल्या वर्षीही एसटी अपघात झाला होता. त्यामुळे प्रशासनाने या धोकादायक वळणावर रस्त्याचे रुंदीकरण करावे, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांकडून केली जात आहे. दरीत अडकलेली बस बाहेर काढण्याचे काम शनिवारी दुपारपर्यंत सुरू होते.


