चर्चेअंतीच ठरेल काँग्रेससोबत युतीचा अंतिम निर्णय : प्रशांत नाईक

गोव्यात भाजपविरोधात विरोधी पक्षांची एकजूट उभारण्यासाठी गोवा फॉरवर्ड काँग्रेससोबत युतीवर विचारमंथन करत आहे. प्रशांत नाईक यांनी राजकीय भूमिकेबाबत दिले स्पष्टीकरण.

Story: गोवन वार्ता | प्रतिनिधी |
just now
चर्चेअंतीच ठरेल काँग्रेससोबत युतीचा अंतिम निर्णय : प्रशांत नाईक

मडगाव : गोव्यातील सत्ताधारी भारतीय जनता पक्ष (भाजप) सरकारचा पराभव करण्यासाठी राज्यातील सर्व समविचारी विरोधी पक्षांनी एकाच व्यासपीठावर एकत्र यावे, हीच जनतेची तीव्र इच्छा आहे. याच पार्श्वभूमीवर गोवा फॉरवर्ड आणि आम आदमी पक्ष (आप) यांची युती झालेली असताना, काँग्रेस पक्षानेही अद्याप युतीची दारे खुली ठेवली आहेत. त्यामुळे पक्षात सखोल चर्चा करून काँग्रेससोबतच्या युतीबाबतचा अंतिम निर्णय घेतला जाईल, अशी माहिती गोवा फॉरवर्ड पक्षाचे प्रवक्ते प्रशांत नाईक यांनी दिली आहे.

काँग्रेस आणि गोवा फॉरवर्ड पक्षादरम्यान संभाव्य युती किंवा विलीनीकरणाच्या राजकीय चर्चांनी जोर पकडला आहे. या घडामोडींवर मडगाव येथे पत्रकारांशी बोलताना प्रशांत नाईक यांनी पक्षांतर्गत विचारमंथन सुरू असल्याचे स्पष्ट केले. पूर्वी स्थगित ठेवलेल्या युतीच्या निर्णयावर आता पुन्हा एकदा पक्षात चर्चा केली जाणार आहे. काँग्रेससोबत पुढील अधिकृत बोलणी करायची किंवा नाही, याबाबतचा निर्णय पक्ष नेतृत्व अत्यंत वेगाने घेईल असे त्यांनी सांगितले. राजकीय प्रवासात कधी एखादे पाऊल चुकले असल्यास ते मागे घेणे यातच मनाचा मोठेपणा असतो, अशी टिप्पणी करत त्यांनी उंदराला शोधण्यासाठी संपूर्ण घरालाच आग लावणे योग्य नाही, या शब्दांत राजकीय परिपक्वतेचे महत्त्व अधोरेखित केले.

गोव्यातील जनता सध्याच्या सरकारला पर्याय शोधत असून, सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन निवडणूक लढवल्यास भाजपचा पराभव करणे शक्य आहे, असे चित्र दिसत असल्याचे नाईक म्हणाले. भाजप सरकारला सत्तेवरून हटवून जनतेला त्रासातून मुक्त करणे हाच मुख्य राजकीय हेतू आहे आणि ही जबाबदारी पार पाडण्यासाठी पक्ष सर्व आवश्यक पावले उचलण्यास तयार आहे.

काँग्रेसचे गोवा प्रभारी माणिकराव ठाकरे यांनी युतीसाठी पर्याय खुले असल्याचे वक्तव्य केले आहे. या सकारात्मक संकेतांचा विचार करता, योग्य राजकीय वळणावर जुन्या चुका दुरुस्त करून पुढे जाणे योग्य ठरेल. गोव्याच्या व्यापक हितासाठी सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन भाजपविरोधात एकसंध लढा द्यावा, अशी पक्षाची स्पष्ट भूमिका असल्याचे प्रशांत नाईक यांनी आवर्जून नमूद केले.

हेही वाचा
सर्व पहा