‘मगो’च्या देणगीत वाढ, तर ‘आरजीपी’च्या निधीत घट

गोवा फॉरवर्डचा अहवाल अनुपलब्ध : मगोला १.१६ कोटी, आरजीला ५.७५ लाखांची देणगी

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
19th September, 10:20 pm
‘मगो’च्या देणगीत वाढ, तर ‘आरजीपी’च्या निधीत घट

आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये राज्यातील प्रादेशिक पक्षांना मिळालेल्या देणग्यांमध्ये मगो पक्षाच्या देणगीत मागील वर्षाच्या तुलनेत तब्बल २३,१०० टक्क्यांनी मोठी वाढ झाली आहे. तर, याच कालावधीत रिव्हॉल्यूशनरी गोवन्स पक्षाच्या (आरजीपी) देणगीत मात्र ३१.८७ टक्क्यांनी घट झाल्याचे असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (एडीआर) या संस्थेने जारी केलेल्या अहवालातून समोर आले आहे.

मगोच्या देणगीत २३,१०० टक्क्यांची वाढ२०२३-२४ मध्ये मगोला मिळालेली देणगी ५० हजार रुपये होती. २०२४-२५ मध्ये ती वाढून १.१६ कोटी रुपयांवर पोहोचली.

निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार प्रादेशिक पक्षांना २० हजार रुपयांहून अधिक मिळालेल्या देणग्यांची माहिती देणे बंधनकारक असते. एडीआरच्या अहवालानुसार, २०२३-२४ मध्ये मगोपला वैयक्तिक स्वरूपातून आणि रोख रकमेत केवळ ५० हजार रुपये देणगी मिळाली होती.

मात्र, २०२४-२५ मध्ये हा आकडा वाढून १.१६ कोटी रुपयांवर पोहोचला. यापैकी ३५ लाख रुपये वैयक्तिक, तर ८१ लाख रुपये कॉर्पोरेट अथवा व्यावसायिक संस्थांकडून चेक आणि डिमांड ड्राफ्ट (डीडी) स्वरूपात मिळाले आहेत.

विशेष म्हणजे या दोन्ही वर्षांत पक्षाला नाव घोषित न केलेल्या कोणाकडूनही देणगी मिळालेली नाही.

आरजीपीच्या देणगीत ३१.८७ टक्के घट

आरजीपीला २०२३-२४ या आर्थिक वर्षात चेक, डीडी आणि बँक ट्रान्सफरद्वारे ८.४४ लाख रुपये वैयक्तिक देणगी मिळाली होती. २०२४-२५ मध्ये यात घट होऊन त्यांना ५.७५ लाख रुपयांची देणगी मिळाली आहे.

या ५.७५ लाखांपैकी ४.२५ लाख रुपये वैयक्तिक स्वरूपात, तर १.५ लाख रुपये कॉर्पोरेट क्षेत्राकडून मिळाले आहेत. तसेच, या एकूण देणगीपैकी ५.१५ लाख रुपये बँक ट्रान्सफरद्वारे देण्यात आले आहेत.

मगोप्रमाणेच आरजीपीलाही नाव न सांगणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थेकडून देणगी मिळालेली नाही.

गोवा फॉरवर्डचा अहवाल अनुपलब्ध

गोवा फॉरवर्ड पक्षाला २०२४-२५ मध्ये मिळालेल्या देणगीचा अहवाल निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध नसल्याचे एडीआरने अहवालात म्हटले आहे.

दरम्यान, देशातील अन्य प्रादेशिक पक्षांचा विचार करता, २०२४-२५ मध्ये डीएमके पक्षाला सर्वाधिक ३६५.७८ कोटी रुपये देणगी मिळाली आहे.

त्याखालोखाल तृणमूल काँग्रेसला १८४.९६ कोटी, वायएसआर काँग्रेसला १४० कोटी, टीडीपीला ८३.०३ कोटी, एआयएडीएमकेला ६६.३० कोटी तर बीजू जनता दलाला ६० कोटी रुपयांची देणगी मिळाली असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

हेही वाचा
सर्व पहा