दोन बुलेटच्या समोरासमोर धडकेत ६० वर्षीय दुचाकीस्वाराचा मृत्यू

कारोणा-हळदोणा येथील घटना : अन्य दोन तरुण गंभीर जखमी

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
19th September, 11:13 pm
दोन बुलेटच्या समोरासमोर धडकेत ६० वर्षीय दुचाकीस्वाराचा मृत्यू

कारोणा, हळदोणा येथे दोन बुलेट मोटारसायकलींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात एका ६० वर्षीय दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. तर, या अपघातात अन्य दोघेजण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयात (गोमेकॉ) उपचार सुरू आहेत. हा अपघात शनिवारी (१९ रोजी) रात्री साडेनऊच्या सुमारास घडला.

दोन बुलेटची समोरासमोर धडक; एकाचा मृत्यूकारोणा येथे झालेल्या अपघातात ६० वर्षीय सुभाष सुहास चोडणकर यांचा मृत्यू झाला असून दोन तरुण गंभीर जखमी झाले आहेत.

या अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव सुभाष सुहास चोडणकर (वय ६०) असे आहे. तर साईताश संजय कळंगुटकर (वय २१) व प्रचित प्रकाश कळंगुटकर (वय १७) अशी जखमी झालेल्या तरुणांची नावे आहेत. हे तिघेही कारोणा येथील रहिवासी आहेत.

हा अपघात हिडन हार्ट रेस्टॉरंटजवळील मुख्य रस्त्यावर घडला. मृत सुभाष चोडणकर हे जीए ०३ एसी ३१८४ क्रमांकाच्या बुलेटवरून उसकई मार्गे कारोणा येथे घरी जात होते.

त्याचवेळी जखमी साईताश आणि प्रचित हे जीए ०३ एजे ४६४० क्रमांकाच्या बुलेटवरून मित्रांच्या घरी गणेश चतुर्थीनिमित्त आरतीला जात होते. वाटेत दोन्ही दुचाकींची समोरासमोर धडक झाली. यात गंभीर मार लागल्याने सुभाष चोडणकर यांचा मृत्यू झाला.

मित्रांनी जखमींना नेले आरोग्य केंद्रात

हळदोणा व म्हापशातील ‘१०८’ रुग्णवाहिका दुसऱ्या ठिकाणी व्यस्त असल्याने चोडणमधून आलेल्या रुग्णवाहिकेला घटनास्थळी पोहोचण्यास उशीर झाला.

त्यामुळे जखमींना त्यांच्या सोबत असलेल्या मित्रांनीच आपल्या वाहनांवरून एक किलोमीटर अंतरावरील हळदोणा आरोग्य केंद्रात दाखल केले. तिथून त्यांना पुढील उपचारांसाठी बांबोळी येथील गोमेकॉत पाठवण्यात आले.

दरम्यान, घटनास्थळी पोहोचलेल्या रुग्णवाहिका कर्मचाऱ्यांनी सुभाष चोडणकर यांना मृत घोषित केले.

म्हापसा पोलिसांकडून पंचनामा

घटनेची माहिती मिळताच म्हापसा पोलीस ठाण्याचे सहाय्यक उपनिरीक्षक अजय गावकर तसेच रॉबर्ट जीपवरील हवालदार रूपेश कोरगावकर यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.

त्यानंतर त्यांनी दोन्ही अपघातग्रस्त दुचाकी बाजूला करून रस्ता वाहतुकीसाठी मोकळा केला. या प्रकरणाचा पुढील तपास म्हापसा पोलीस उपनिरीक्षक पंढरी चोपडेकर करत आहेत.

हेही वाचा
सर्व पहा