फोंडा येथील श्री कपिलेश्वरी देवस्थानाच्या तलावात मृत मासे

कपिलेश्वरी देवस्थान तलावात तीन दिवसांपासून मृत मासे पडून असल्याने समोर आले आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाने पाण्याचे नमुने तपासावेत, तसेच उर्वरित गणेश विसर्जन सोहळ्यापूर्वी तळ्याची स्वच्छता करावी अशी मागणी नागरिकांनी प्रशासनाकडे केली आहे.

Story: गोवन वार्ता | प्रतिनिधी |
7 mins ago
फोंडा येथील श्री कपिलेश्वरी देवस्थानाच्या तलावात मृत मासे

फोंडा : तालुक्यातील कवळे येथील प्रसिद्ध कपिलेश्वरी देवस्थानच्या तलावात मोठ्या प्रमाणावर मासे मृत अवस्थेत आढळल्याची अत्यंत गंभीर घटना समोर आली आहे. गेल्या तीन दिवसांपासून हे मृत मासे पाण्याच्या पृष्ठभागावर तरंगत पडून आहेत, मात्र स्थानिक पंचायत, देवस्थान समिती किंवा संबंधित प्रशासनाकडून हे मृत मासे हटवण्यासाठी कोणतीही ठोस पावले उचलली गेलेली नाहीत. यामुळे तलाव परिसरात तीव्र दुर्गंधी पसरू लागली असून, स्थानिक नागरिकांमध्ये प्रशासनाच्या कारभाराविरुद्ध तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

या तलावात दीड आणि परवा पाच दिवसांच्या शेकडो गणपती मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. गणेश विसर्जन सोहळ्यादरम्यान तलाव परिसरात फटाक्यांचे अवशेष पाण्यात मिसळल्याची शक्यता निर्माण झाली आहे.  त्यातील पोटॅशियम नायट्रेट, सल्फर आणि विविध जड धातूंच्या (Heavy Metals) रसायनांमुळे पाण्याचा पीएच (pH) स्तर बिघडतो. तसेच गणेशमूर्तींवर वापरण्यात आलेले कृत्रिम व रासायनिक रंग, पीओपी (Plaster of Paris) आणि विसर्जित केलेल्या निर्माल्याचे विघटन होताना पाण्यातील विरघळलेल्या ऑक्सिजनची (Dissolved Oxygen) पातळी अत्यंत वेगाने खालावते. पाण्यात ऑक्सिजनची तीव्र कमतरता निर्माण झाल्याने माशांचा गुदमरून मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

आज सातव्या दिवशीच्या गणेशमूर्तींचे तसेच येत्या २४ तारखेला फोंड्याचा प्रसिद्ध सार्वजनिक गणपती आणि इतर मूर्तींचे विसर्जन याच तलावात होणार आहे. अशा परिस्थितीत मृत मासे पाण्यातच कुजल्यामुळे तलावाचे पाणी दूषित झाले असून विसर्जनासाठी तलावात उतरणाऱ्या भाविक व नागरिकांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण झाला आहे. तलावातील दूषित पाण्यामुळे गावात संसर्गजन्य आजार किंवा रोगराई पसरण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

या पार्श्वभूमीवर स्थानिक ग्रामपंचायत, पंचायत सचिव आणि गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने तात्काळ या घटनेची दखल घेणे गरजेचे आहे. प्रशासनाने तलावातील मृत मासे त्वरित बाहेर काढून पाण्याच्या नमुन्यांची वैज्ञानिक तपासणी (Water Quality Testing) करावी आणि मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट करून पाणी सुरक्षित होईपर्यंत आवश्यक ती सर्व खबरदारी घ्यावी, अशी आग्रही मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.


हेही वाचा
सर्व पहा