इंदूर : लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. देशातील नागरिकांचे फोन, व्हॉट्सॲप आणि फेसबुक यांसारखी संवादाची माध्यमे टॅप केली जात असून, त्याद्वारे मिळवली जाणारी गोपनीय माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत पोहोचवली जाते, असा दावा राहुल गांधी यांनी केला आहे. मध्य प्रदेशातील इंदूर येथे आयोजित काँग्रेसच्या 'छात्रों की गूंज' या उपक्रमाच्या पाचव्या आवृत्तीत विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांनी केंद्र सरकारवर थेट हल्लाबोल केला.
'सिस्टम विरुद्ध विद्यार्थी' या विषयावर विद्यार्थ्यांना संबोधित करताना राहुल गांधी यांनी स्वतःचा मोबाईल फोन उपस्थितांना दाखवला. माझ्या फोनमध्ये आणि तुमच्याही फोनमध्ये डोवालजी बसले आहेत, असे सांगत त्यांनी केंद्र सरकारच्या कामकाज पद्धतीवर टीका केली. अजित डोवाल यांच्या वक्तव्याचा हवाला देत राहुल गांधी म्हणाले की, भारतासारख्या विशाल देशाला नियंत्रित करण्यासाठी केवळ ५०० लोकांवर नियंत्रण मिळवणे पुरेसे आहे, असे डोवाल अनौपचारिक चर्चांमध्ये म्हणतात. देशाची संपूर्ण व्यवस्था सध्या अवघ्या सहा व्यक्तींच्या हातात केंद्रित झाली असून त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, एनएसए अजित डोवाल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत आणि उद्योगपती गौतम अदानी व मुकेश अंबानी यांचा समावेश आहे, असा घणाघाती आरोपही त्यांनी केला.
शिक्षण क्षेत्र, सरकारी भरती आणि विद्यार्थ्यांसमोरील अडचणींवर बोलताना राहुल गांधी यांनी सध्याची व्यवस्था विद्यार्थ्यांना प्रश्न विचारू देत नाही, असे सांगितले. शिक्षण हे कुणी कुणावर केलेला उपकार नाही, तो प्रत्येक विद्यार्थ्याचा मूलभूत अधिकार आहे. मात्र, देशातील सर्व शिक्षण संस्था आणि इतर सरकारी यंत्रणांवर विशिष्ट विचारांच्या लोकांचे नियंत्रण प्रस्थापित करण्यात आले आहे. विद्यार्थी जेव्हा प्रश्न विचारतात, तेव्हा ते या व्यवस्थेला धोकेदायक वाटू लागतात, असे सांगत त्यांनी शिक्षण अर्थसंकल्पातील निधीत कपात, रिक्त शिक्षक पदे आणि सरकारी शाळा बंद पाडण्याच्या धोरणावर तीव्र नाराजी व्यक्त केली.
इंदूरमधील या भव्य कार्यक्रमाला हजारो विद्यार्थ्यांची आणि तरुणांची प्रचंड गर्दी झाली होती. कार्यक्रमादरम्यान मध्य प्रदेशातील विविध भागांतून आलेल्या विद्यार्थ्यांनी परीक्षांमधील गोंधळ, पेपर लीक, सरकारी नोकऱ्यांमधील भरतीचा विलंब आणि शिष्यवृत्ती न मिळणे यांसारख्या विविध समस्या राहुल गांधींसमोर मांडल्या. देशातील तरुणांनी अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे आणि प्रश्न विचारणे चालूच ठेवावे, असे आवाहन करत राहुल गांधी यांनी आपल्या भाषणाचा शेवट केला.


