पणजी : पर्वरी येथील नव्याने वाहतुकीसाठी खुल्या करण्यात आलेल्या एलिव्हेटेड उड्डाणपुलावर अपघातांचे सत्र सुरूच असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. २१ सप्टेंबर रोजी पहाटे सुमारे दीड वाजण्याच्या सुमारास या उड्डाणपुलावर रस्ता अपघात घडला, ज्यामध्ये दोघे जण जखमी झाले आहेत. उड्डाणपुलावरून जात असताना एका भरधाव पांढऱ्या रंगाच्या हॅचबॅक कारने समोर चाललेल्या काळ्या रंगाच्या ह्युंदाई क्रेटा गाडीला मागून जोरदार धडक दिली. यात दोन्ही वाहनांचे नुकसान झाले आहे. अपघातात जखमी झालेल्या दोन्ही व्यक्तींना तातडीने उपचारासाठी बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयात (GMC) दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन अपघातग्रस्त वाहने बाजूला केली. हा अपघात नेमका कोणत्या कारणांमुळे घडला, चालक वेगात होता की गाडीवरील नियंत्रण सुटले, याबाबतचा स्पष्ट तपशील अद्याप समोर आलेला नसून पोलीस अधिक तपास करत आहेत.
विशेष म्हणजे, या उड्डाणपुलाच्या उद्घाटनानंतर दुसऱ्याच दिवशी एका भीषण अपघातात दोघांचा मृत्यू झाला होता, तर दोघे जखमी झाले होते. या गंभीर घटनेनंतर सार्वजनिक बांधकाममंत्री दिगंबर कामत आणि संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने पुलाची पाहणी करून सुरक्षेचा सविस्तर आढावा घेतला होता. नव्याने सुरू झालेल्या या उड्डाणपुलावर वाहनांचा वेग अनियंत्रित होण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाकडून वेगमर्यादा तपासणारे कॅमेरे बसविण्यात आले आहेत.
वाहनचालकांनी निर्धारित वेगमर्यादेचे आणि वाहतूक नियमांचे पालन करावे, अन्यथा अतिवेगाने वाहन चालविणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा वाहतूक पोलिसांकडून देण्यात आला आहे. राज्यातील अपघातांचे वाढते प्रमाण लक्षात घेता पोलीस प्रशासनाकडून अपघातप्रवण क्षेत्रांची पाहणी करून आवश्यक ती खबरदारी घेतली जात आहे.सुरक्षेचा उपाय म्हणून प्रशासनाने या उड्डाणपुलावर दुचाकी वाहनांच्या प्रवेशावर बंदी घातली आहे. मात्र, अटल सेतूच्या बाजूने उड्डाणपुलावर येणारे आणि बाहेर पडणारे सर्व एंट्री आणि एक्जिट मार्ग पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्यात आल्यामुळे वाहनचालकांमध्ये मोठा गोंधळ आणि संभ्रम निर्माण झाला आहे.
गिरी येथून पर्वरी उड्डाणपुलावर प्रवेश करणाऱ्या वाहनचालकांना थेट मेरशी जंक्शनवर जावे लागत आहे. पर्यटकांसह स्थानिक चालकांना या बदलांची पूर्वकल्पना नसल्याने उड्डाणपूल संपल्यानंतर वाहने थांबवून पणजी किंवा पर्वरीकडे जाण्यासाठी डावीकडील रस्ता शोधताना कसरत करावी लागत आहे. म्हापशातून पणजीकडे जाणाऱ्या वाहनांना थेट मेरशी जंक्शनवर जावे लागत असल्याने तेथील वाहतूक कोंडीत भर पडत आहे.
आज मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक
दुचाकींवरील बंदी आणि बंद केलेल्या मार्गांमुळे पर्वरीतील अंतर्गत रस्त्यांवर वाहतूक कोंडी होत असून पर्वरी, कळंगुट आणि साळगाव मतदारसंघातील स्थानिकांना याचा मोठा फटका बसत आहे.या सर्व पार्श्वभूमीवर, पर्वरी उड्डाणपूल स्थानिकांसाठी अधिक सोयीस्करपणे खुला करण्याबाबत आणि सध्याच्या वाहतूक निर्बंधांचा सविस्तर आढावा घेण्यासाठी आज सोमवारी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एक अत्यंत महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत आयआयएम (IIM) नागपूरच्या पथकाने केलेल्या तांत्रिक पाहणीचे सादरीकरण केले जाणार आहे.
या उच्चस्तरीय बैठकीला सार्वजनिक बांधकाममंत्री दिगंबर कामत, पर्यटनमंत्री रोहन खंवटे, स्थानिक आमदार केदार नाईक, आमदार जोशुआ डिसोझा, आयआयएम नागपूरचे प्रतिनिधी तसेच सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत. उड्डाणपुलाचे प्रवेश आणि बाहेर पडण्याचे मार्ग खुले केल्यास पर्वरीकरांना त्याचा कसा योग्य वापर करता येईल आणि वाहनांची संख्या वाढल्यास वेगमर्यादा किती असावी, यावर या बैठकीत अंतिम निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.


