पणजी :पर्वरी उड्डाणपूल स्थानिकांसाठी खुला करण्याबाबत आणि सध्याच्या वाहतूक निर्बंधांचा आढावा घेण्यासाठी सोमवारी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एक महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीत आयआयएम नागपूरच्या पथकाकडून सादरीकरण केले जाणार असून, अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा करून उड्डाणपुलाबाबत योग्य तो निर्णय घेतला जाणार आहे.
या बैठकीला सार्वजनिक बांधकाममंत्री दिगंबर कामत, पर्यटनमंत्री रोहन खंवटे, आमदार केदार नाईक, आमदार जोशुआ डिसोझा, आयआयएम नागपूरचे प्रतिनिधी तसेच सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
उड्डाणपुलाचे प्रवेश आणि बाहेर पडण्याचे मार्ग खुले केल्यास पर्वरीकरांना त्याचा कसा उपयोग करून देता येईल, यावर सादरीकरण केले जाईल. उड्डाणपुलावरील वाहनांची संख्या वाढल्यास वेगमर्यादा किती असावी, यावरही या बैठकीत चर्चा केली जाणार आहे.
वाहतूक व्यवस्थापन आणि रोड इंजिनिअरिंगमधील तज्ज्ञ असलेल्या आयआयएम नागपूरच्या पथकाने शनिवारी उड्डाणपूल आणि अटल सेतूमधील पट्ट्याची पाहणी केली.
सार्वजनिक बांधकाम खात्याने वाहतुकीबाबतची सर्व माहिती या संस्थेला दिली असून, सोमवारी त्यांच्याकडून सुरक्षा उपाययोजना आणि निर्बंधांबाबत अहवाल सादर केला जाईल.
त्यानंतर अंतिम निर्णय घेतला जाईल, असे सार्वजनिक बांधकाम खात्याचे प्रधान मुख्य अभियंता संदीप चोडणेकर यांनी सांगितले.
- सोमवारी होणाऱ्या या बैठकीतून कायमस्वरूपी तोडगा निघणार नसला तरी तात्पुरती उपाययोजना केली जाईल.
- आयआयएम नागपूर सविस्तर अभ्यास करून अंतिम अहवाल देईल, त्यानंतरच कायमस्वरूपी व्यवस्था केली जाईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
- देशातील प्रमुख महामार्ग तसेच वाहतूक कोंडीवर आयआयएम नागपूरने उपाय सुचवले असल्यामुळे गोवा सरकारने त्यांच्यासोबत सामंजस्य करार (एमओयू) केलेला आहे.
अपघातामुळे लागू केले निर्बंध
उड्डाणपुलाच्या उद्घाटनानंतर तेथे भीषण अपघात झाल्याने दुचाकींना बंदी घालण्यात आली आहे. तसेच बॅरिकेड्स लावून उड्डाणपुलावरील प्रवेश आणि बाहेर पडण्याचे मार्ग बंद केले आहेत.
उड्डाणपूल खुला केल्यानंतर त्यावर ताशी ६५ किमी वेगमर्यादा होती, मात्र अपघातग्रस्त मोटार ताशी १०० किमीपेक्षा अधिक वेगाने आल्याने अपघात घडला होता.
त्यामुळे वेगमर्यादेचे पालन करण्यासाठी विशेष यंत्रणा उभारणे आवश्यक आहे.
दुचाकींवरील बंदी आणि बंद केलेल्या मार्गांमुळे पर्वरीतील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. चतुर्थीच्या सातव्या दिवशी सायंकाळी रस्त्यांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
कोंडीवर उपाय म्हणून निर्बंध कमी केल्यास वाहतूक अधिक धोकादायक होण्याची भीती आहे. सध्याच्या निर्बंधांमुळे पर्वरीसह कळंगुट आणि साळगाव मतदारसंघातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.


