पणजी :राज्यात सप्टेंबर महिन्यात पावसाने मोठी दडी मारल्याने शेतीच्या नुकसानीस सुरुवात झाली आहे. पर्जन्यमान लक्षणीयरीत्या कमी झाल्याने आणि तापमानात वाढ झाल्याने भातपिकाची मुळे करपू लागली आहेत. वेळेवर पाऊस न पडल्यास शेती व बागायतीचे मोठे नुकसान होण्याची भीती निर्माण झाली आहे.
सप्टेंबरमध्ये आतापर्यंत एकाही दिवशी एक इंचापेक्षा अधिक पाऊस पडलेला नाही. हवामान खात्याने पावसाचा ‘येलो अलर्ट’ जारी केला आहे. दोन-तीन दिवस चांगल्या सरी कोसळल्यास परिस्थितीत सुधारणा होऊ शकते.
मात्र, या आठवड्यात पाऊस पडला नाही, तर परिस्थिती आणखी बिघडेल, असे कृषी संचालक चंद्रहास देसाई यांनी सांगितले.
पावसाची ३२ टक्के तूट
राज्यात आतापर्यंत सरासरी ७८ इंच पावसाची नोंद झाली असून, हे प्रमाण सरासरीच्या तुलनेत ३२ टक्क्यांनी कमी आहे. १७ सप्टेंबर रोजी सर्वाधिक १३.९ मिलिमीटर पाऊस पडला.
पावसाच्या काही सरी कोसळल्या, मात्र त्यांचा फार काळ टिकाव लागला नाही. पाऊस नसल्याने तूट पुन्हा वाढत असून, उकाड्यासोबत तापमानातही वाढ होत आहे.
पिके तयार होण्यास विलंब
सप्टेंबर महिना संपण्यास आता जवळपास दहा दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे यंदा राज्यातील पावसाची सरासरी पूर्ण होण्याची शक्यता फार कमी आहे. गेल्या तीन-चार वर्षांत पावसाचे प्रमाण अधिक होते, मात्र यंदा त्यात मोठी घट झाली आहे.
जूनमध्येही पाऊस कमी होता. पावसाला उशिरा सुरुवात झाल्याने पिकांच्या वाढीवर परिणाम झाला असून, यंदा पिके तयार होण्यासही उशीर होणार आहे.
आता भाताला कणसे आल्यानंतर पुन्हा पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे पाण्याअभावी रोपे करपण्याची भीती आहे.
पणजी, म्हापसा, दाबोळी आणि मुरगाव परिसरात पावसाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात कमी असून, पणजीत आतापर्यंत ५२ इंच पावसाची नोंद झाली आहे.
वाळपई, धारबांदोडा, केपे, सांगे आणि काणकोण परिसरात मात्र पावसाचे प्रमाण अधिक आहे.
विविध भागांत नोंदलेला पाऊस
| ठिकाण | पाऊस (मिमी) |
|---|---|
| म्हापसा | १,५४९.७ |
| पेडणे | १,९१०.० |
| पणजी | १,३३१.४ |
| जुने गोवे | १,७५२.४ |
| साखळी | २,०१९.८ |
| वाळपई | २,७४९.७ |
| फोंडा | १,९२७.० |
| धारबांदोडा | २,७५५.४ |
| काणकोण | २,०७३.८ |
| दाबोळी | १,४२६.५ |
| मडगाव | १,८८९.९ |
| मुरगाव | १,३९५.१ |
| केपे | २,३९२.१ |
| सांगे | २,६०२.९ |


