पणजी :छाप्यादरम्यान जप्त केलेला कोकेन हा मुख्य मुद्देमाल न्यायालयात सादर करण्यात अमली पदार्थ विरोधी पथकाला (एएनसी) अपयश आल्याने संशयित डॉमिनिक न्वेके या नायजेरियन नागरिकाची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. या प्रकरणातील एका महत्त्वाच्या पंच साक्षीदारानेही आपला जबाब फिरवल्याने मेरशी येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश आरतीकुमारी नाईक यांनी हा निकाल दिला.
अमली पदार्थ विरोधी पथकाने (एएनसी) वारंवार स्मरणपत्रे पाठवूनही तपास अधिकाऱ्यांनी हा मुद्देमाल न्यायालयात जमा केला नाही. तसेच, छापा टाकताना किंवा जप्तीचा पंचनामा करताना आपल्याला बोलावलेच नव्हते, असा जबाब या प्रकरणातील महत्त्वाच्या पंच साक्षीदाराने न्यायालयात दिला.
त्यामुळे पुराव्याअभावी गुन्हा सिद्ध होऊ शकला नसल्याचे निरीक्षण नोंदवून न्यायालयाने संशयिताची सुटका केली.
अशी झाली होती कारवाई
एएनसीने १४ जानेवारी २०२३ रोजी याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. मोरजी आणि हरमल परिसरात एक विदेशी नागरिक समुद्रकिनाऱ्यावर राहून विदेशी नागरिकांना ड्रग्जचा पुरवठा करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
त्यानुसार, एएनसीचे तत्कालीन अधीक्षक राजू राऊत देसाई आणि उपअधीक्षक नेर्लोन आल्बुकर्क यांच्या मार्गदर्शनाखाली १३ जानेवारी २०२३ रोजी सायंकाळी ४.२५ च्या सुमारास मोरजी खिंड गार्डनजवळ सापळा रचण्यात आला.
५.५ लाखांचा कोकेन जप्त
पोलीस निरीक्षक अरुण गावस देसाई यांच्या नेतृत्वाखालील पथकात महिला पोलीस उपनिरीक्षक प्रियांका गारुडी, कॉन्स्टेबल नितेश मुळगावकर, संदेश वळवईकर, प्रशांत सुतार, लक्ष्मण म्हामल व इतरांचा समावेश होता.
गुप्तहेरांच्या माहितीनुसार तिथे आलेल्या एका विदेशी नागरिकाची चौकशी करून डॉमिनिक न्वेके (४०) याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्या झडतीत पथकाने ५.५ लाख रुपये किमतीचा ५५ ग्रॅम कोकेन जप्त केला होता.
तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक रोहन मडगावकर यांनी अमली पदार्थ विरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून संशयिताला अटक केली होती. एएनसीने तपास पूर्ण करून १३ मार्च २०२३ रोजी न्यायालयात आरोपपत्र दाखल केले.
न्यायालयाने ७ जुलै २०२३ रोजी आरोप निश्चित करून सुनावणी सुरू केली. या खटल्यात सरकारी पक्षातर्फे ९ साक्षीदारांची उलटतपासणी करण्यात आली.
मात्र, कोकेनची अनुपस्थिती आणि साक्षीदाराने फिरवलेला जबाब यामुळे एएनसीची कारवाई संशयाच्या भोवऱ्यात सापडली आणि ठोस पुराव्याअभावी गुन्हा सिद्ध होऊ शकला नाही.
- या प्रकरणात संशयिताच्या वतीने अॅड. कमलाकांत ऊर्फ राजू पोवळेकर यांनी बाजू मांडली. त्यांना अॅड. अभरीश गवंडळकर आणि अॅड. पी. बेतकेकर यांनी साहाय्य केले.
- लाखो रुपयांचे कोकेन आणि मुद्देमाल न्यायालयात का सादर केला गेला नाही, यावर न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
- गहाळ झालेल्या मुद्देमालाबाबत एएनसीच्या पोलीस अधीक्षकांनी सखोल तपास करून पुढील सहा महिन्यांच्या आत अहवाल सादर करावा, असा आदेश न्यायालयाने दिला आहे.


